Washim Crime News : सरकारी जागेवरील अतिक्रमणाला विरोध बेतला जीवावर; भरदिवसा दस्तलेखकालाच संपवलं
Washim Crime News: सरकारी जागेवर अतिक्रमणाला विरोध केल्याने एका खासगी दस्तलेखकावर एका व्यक्तीने अचानक मागून येत चाकू हल्ला केलाय. या घटनेत अधिक रक्तस्त्राव झाल्याने दस्तलेखकाचा जागीच मृत्यू झालाय.
Washim Crime News : वाशिमच्या(Washim) कारंजा शहरात तहसील कार्यलय परिसरात मन सुन्न करणारी घटना घडलीय. सरकारी जागेवर अतिक्रमणाला विरोध केल्याने एका खासगी दस्तलेखकावर एका व्यक्तीने अचानक मागून येत चाकू हल्ला (Crime) केलाय. या घटनेत अधिक रक्तस्त्राव झाल्याने दस्तलेखकाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना कारंजा (Karanja) तहसील कार्यालय परिसरात 1 मार्चच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
भरदिवसा दस्तलेखकालाच संपवलं
हरिश्चंद्र विलास मेश्राम (38) असे मृतक दस्तलेखकाचे नाव असून ते कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी आहेत. तर यातील संशयित आरोपी मिथुन विठठलराव सिरसाठ (रा.मेहा तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम) यांनी ही हत्या केली असून पोलिसांनी त्याला हत्येच्या घटणेनंतर अवघ्या काही तासातच अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून त्यांची ही हत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील मेहा गावात एक सरकारी हातपंप असून त्यातील पाणी सर्वांसाठी वापरण्यासाठी आहे. मात्र परिसरात राहणाऱ्या प्रेमदास भगत याने सरकारी हातपंप काढून त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटार पंप टाकून या पाण्याचा खाजगी वापर सुरू केला. त्यावर हरिचंद्र मेश्राम यांनी आक्षेप घेत या अतिक्रमाणा बाबत ग्रामपंचायत कार्यालय मेहा येथे तकार केली होती. दरम्यान या तक्रारीवरून 4 डिसेंबर 2023 ला प्रेमदास आणि हरिचंद्र यांच्यात वाद देखील झाला होता. यात प्रेमदास यांनी शिवीगाळ करत हरिचंद्र यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावर हरिचंद्र यांनी धनज पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार देखील दाखल केली होती.
सरकारी जागेवरील अतिक्रमणाला विरोध बेतला जीवावर
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील हा वाद पुन्हा उफाळून आला आणि यात प्रेमदास यांच्या पत्नी चे हरिचंद्र यांच्या पत्नी सोनाली सोबत पुन्हा शाब्दिक वाद झाला. कालांतराने त्यांच्यातील हा वाद विकोपाला गेला आणि धनज पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून मिथुन विठठलराव सिरसाठ याने हरिचंद्र यांच्यावर चाकूने हल्ल केला. या हल्ल्यात हरिचंद्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेवर आणि गळ्याच्या उजव्या बाजूला चाकूचा वार बसल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही तासातच मारेकऱ्याला अटक
भरदिवसा झालेल्या या हत्येच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. यात कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कारंजा शहर यानी वेगवेगळे पथक तयार केले. त्यानंतर तपासाचे चक्र गतिमान करत या घटनेतील मारेकऱ्यांचा शोध पोलिसांनी घेतला असता संशयित आरोपी मिथुन सिरसाठ (रा. मेहा तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम) याला गुन्हा घडल्यापासुन अवघ्या काही तासाच्या आत ताब्यात घेवुन त्याला अटक करण्यात आली. तर या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या