Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील विघ्न सुरुच, वाशिममधील चोगलदरी गावाजवळ पुलाचा गर्डर कोसळला
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील आणखी एका पुलाचा गर्डर कोसळला. वाशिममधील चोगलदरी गावाजवळ ही दुर्घटना घडली. दरम्यान गर्डर कोसळल्याचं कोणाला समजू नये यासाठी कंत्राटदाराकडून ढिगारा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Samruddhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाही. समृद्धी महामार्गावरील आणखी एका पुलाचा गर्डर कोसळला. वाशिम जिह्यातील चोगलदरी गावाजवळील पुलाचा मोठा गर्डर गुरुवारी (25 ऑगस्ट) रात्री कोसळला. यामध्ये कोणीही जखमी झालेलं किंवा जीवितहानी झाली नाही. दरम्यान या पॅकेजचं काम करणाऱ्या कंपनीने तात्काळ कोसळलेला गर्डर हलवला.
समृद्धी महामार्गावरील पूल कोसळल्याने कंत्राटदाराकडून पडलेल्या गर्डरचा ढिगारा लपवण्याचा प्रयत्न
नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वी वाशिमच्या जोगदरी गावाजवळील रात्रीच्या वेळी पुलाचा गर्डर कोसळला. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गर्डर कोसळल्याची माहिती इतरांना समजू नये, यासाठी कंत्राटदार आणि मजुरांनी रातोरात जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने संबंधित पुलाचा तुटलेला ढिगारा लपवण्याचा प्रयत्न केला. याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी कोणीच समोर येत नाही.
यापूर्वीही समृद्धी महामार्गावर अपघात
याआधी 27 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज 07 मधील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काही गर्डर कोसळले होते. यात ट्रेलर ट्रकचं मोठं नुकसान झालं होतं. तर त्यापूर्वी 24 एप्रिलच्या पहाटे समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले होते. नागपूरपासून 36 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला होता. समृद्धी महामार्गाला एकूण 105 कमानी आहेत. त्यापैकी मोठी असलेली सोळाव्या क्रमांकाची कमान कोसळून अपघात झाला होता.
समृद्धी महामार्गाविषयी सर्वकाही
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग
- मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं.
- सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे.
- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई!
- जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.
- समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.
- महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे.
- प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष.
- महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे.
- जवळपास 50 पेक्षा जास्त उड्डाणपुल, 24 हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच 5 बोगदे प्रस्तावित आहेत.
- हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे
- युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.
- समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे काम करणार आहे. तब्बल 25 लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.
- या प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी पन्नास हजार एकर जमीन लागणार आहे.