Wardha News : कंपन्या बांधावर येत नसेल तर विमा मिळणार कसा? शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत
Wardha News : शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्षेत असल्याचं चित्र आहे. दरम्यान 72 तास संपत आले तरीही विमा कंपन्या नॉट रिचेबल असल्याचं चित्र सध्या आहे.
वर्धा : गेल्या तीन दिवसांत वर्ध्यासह विदर्भात अवकाळी पावसाने (Rain) तूर आणि कपाशी या प्रमुख पिकांचे नुकसान केले. दरम्यान शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतातील कपाशीचे पीक ओले झाल्याने, शेतकऱ्यांचे डोळेही पाणावलेत. तसेच तूर पिकांचा बार पण गळालाय. वर्धा जिल्ह्यात असंख्य शेतकऱ्यांनी एक रूपयात पीक विमा (Crop Insurance) काढला होता. आता आपल्याला या विम्याचा फायदा होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कंपन्यांना फोन लावले पण अनेक विमा प्रतिनिधीचे फोन नॉट रिचेबल आल्याचं सांगण्यात येतेय. त्याचप्रमाणे काही विमा प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांना योग्य उत्तर मिळाला नाहीए. याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट देखील घेतली.
वर्धा जिल्ह्यात 58 हजार 71 हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड करण्यात आली होती. तर 2 लाख 19 हजार 32 हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात लागवड क्षेत्र असलेल्या वर्धा जिल्ह्यात खरीप पिकांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. कापूस वेचणे शक्य झाले नाही, कापूस भिजला, मातीने भरला आणि बोंडे देखील सडली.
वायगाव येथील नरेंद्र पराते या शेतकऱ्यांच्या शेतात तूर आणि कपाशीचे नुकसान झाले. या शेतकऱ्याने पीक विमा काढला होता. पीक विमा भरपाई मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्याने विमा कंपनीच्या प्रतिनिधींला फोन लावला. पण अनेक प्रयत्ना नंतरही फोन लागला नाही. म्हसाळा येथील शेतकरी पंकज काचोळे या शेतकऱ्यांने देखील संपर्क केला. पिकाचे नुकसान झाल्यानंतर हक्काची मदत मिळावी यासाठी अनेक शेतकरी विमा कंपनीला फोन करत आहे. पण कुणाचा फोन लागत नाही तर कुणाचा उचलल्या जात नाही. चूकून उचलला गेला तर योग्य उत्तर मिळत नाही अशं चित्र पाहायला मिळतय.
शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतेत
पीक विमा कंपनीला 72 तासांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते. त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनीधी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी करतील असे अभिप्रेत होते. पण जिथे फोन लागतच नाही, तिथे काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न सध्या शेतकरी वर्गासमोर आहे. त्यामुळे पीक विम्याच्या घोषणा हवेतच विरत असल्याचं चित्र सर्वांना पाहायला मिळतंय. त्यातच विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचं आणि सरकारचं दोघांचं ऐकत नसल्याचं चित्र असल्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख्यांनी म्हटलं. तसेच आता कापूस भिजला तुरही गळाली असल्याने आता शेतकऱ्यांच्या पाणावलेल्या नजरा आता सरकारच्या मदतीकडे लागल्याचं पाहायला मिळतंय.