Shivendraraje Bhonsle : शिवेंद्रराजे भोसलेंना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान, सातारा विधानसभा मतदारसंघाला 25 वर्षानंतर मंत्रिपदाचा मान
Shivendraraje Bhonsle : सातारा विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी झाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित झालं आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 5 डिसेंबरला तिसऱ्यांदा शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये कार्यरत आहेत. महायुतीला सातारा जिल्ह्यातून दमदार यश मिळालं आहे. सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 पैकी 8 जागांवर महायुतीनं विजय मिळवला. यात भाजपचे चार, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकींनतर भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आता भाजपकडून मंत्रिपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव निश्चित झालं आहे. शिवेंद्रराजे भोसले मंत्रिपदाच्या माध्यमातून राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत.
साताऱ्याचे पाचव्यांदा आमदार
शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस शिवेंद्रराजे यांनी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2009, 2014 ला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला त्याप्रमाणं शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
दोनवेळा भाजपच्या चिन्हावर विजयी
शिवेंद्रराजे भोसले 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर लढले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक पवार यांचा पराभव केला. 2024 ला पुन्हा एकदा शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमित कदम यांचा पराभव केला.
सातारा तालुक्यातील राजकारणावर वर्चस्व
अभयसिंहराजे भोसले यांचं सातारा तालुक्यातील वर्चस्व होतं. त्याप्रमाणं जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा पंचायत समितीवर वर्चस्व कायम ठेवलं आहे. याशिवाय सातारा मतदारसंघात जावळीतील गावांचा समावेश झाल्यानंतर जावळी पंचायत समिती देखील आपल्या ताब्यात ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं.
अजिंक्यतारा साखर कारखाना ते सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन
शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्त्वात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यानं आता जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना देखील चालवण्यास घेतला आहे. ते 1994 पासून अजिंक्यतारा साखर कारखान्यात सुरुवातीची काही वर्ष अध्यक्ष त्यानंतर मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 2015 मध्ये बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे.
सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोमिलनामध्ये दहा वर्ष नगरविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राबवली आहे. कोरेगाव, कराड उत्तर मतदार संघात सातारा तालुक्यातील गावं असल्यानं तिथं देखील शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा प्रभाव आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी 2024 मध्ये उदयनराजे यांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
इतर बातम्या :