Wardha News : केंद्रीय पथकाकडून वर्ध्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांशीही साधला संवाद
Maharashtra Wardha News : केंद्रीय पथकाकडून वर्ध्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला.
Maharashtra Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांचा सर्व पीक खरडून गेलं. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. शेतीपिकांसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले. केंद्र शासनाच्या विशेष पथकाने मंगळवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ठिकठिकाणी पथकातील केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकरी तथा नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद देखील साधला.
पथकाचं जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सेलू तालुक्यातील गोंदापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पथकानं पाहणी केली. त्यानंतर वर्धा तालुक्यातील शिरसगाव (ध.) आणि देवळी तालुक्यातील सरुळ, बोरगाव (आ.) येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बोरगाव येथे पथकातील अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर बोरगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली व तेथे देखील नुकसानग्रस्तांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या.
हिंगणघाट येथील नुकसानग्रस्तांच्या जाणल्या व्यथा
केंद्रीय पथकानं हिंगणघाट तालुक्यातील चाणकी येथील नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. याच तालुक्यातील मनसावळी येथे भेट देऊन पाहणी केली. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली या गावाला अतिवृष्टीमुळं पुराचा वेढा पडला होता. गावाच्या संपर्क तुटल्यानं तेथील नागरीकांना प्रशासनानं विशेष बचाव मोहिम राबवून सुरक्षितस्थळी हलविलं होतं. गावात पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं होतं. पथकानं या गावाला भेट देवून पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. दरवर्षी पुरामुळे गावाला धोका निर्माण होत असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितलं.
वना नदीला आला होता मोठा पूर
हिंगणघाट शहरालगत असलेल्या वना नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्यानं लगतच्या शेत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नदी काठावरील घरांचं देखील नुकसान झालं होतं. यावेळी पथकानं पुरामुळं नुकसान झालेल्या नदी काठावरील पिकांची पाहणी केली. त्यानंतर पथकानं समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्यानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. येथे देखील पथकातील सदस्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
पथकानं घेतली नुकसानीची माहिती
सेलू तालुक्यातील गोंदापूर येथील पाहणी केल्यानंतर पथक वर्धा विश्राम गृह येथे दाखल झाले. याठिकाणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभरात यांनी ही माहिती दिली. हिंगणघाट येथे विश्रामगृह येथे आमदार समीर कुणावार यांनी पथकाची भेट घेतली आणि नुकसानीबाबत चर्चा केली.
या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
या पाहणी पथकात पथक प्रमुख म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा, जलशक्ती मंत्रालयाचे संचालक उंबरजे हरीष गिरीष, ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक डॅा.माणिक चंद्र पंडीत, ऊर्जा मंत्रालयाच्या सहायक संचालक मिना हुडा यांचा समावेश होता. यावेळी पथकासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॅा.विद्या मानकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, शिल्पा सोनाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांच्यासह सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट,समुद्रपुरचे तहसिलदार, वीज, पाणी पुरवठा, बांधकाम, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.