(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आश्चर्यच! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पोहोचले विद्रोही साहित्य संमेलनात!
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या सभामंडपाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष चपळगावकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी भेट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे
Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan: वर्ध्यात 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसंच 17 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी विद्रोही साहित्य संमेलनस्थळी भेट दिली. यावेळी ते काही वेळ विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील सभामंडपात बसले. चपळगावकर आणि बंग यांनी दिलेली भेट अनेकांकरीता आश्चर्याची ठरली. यावेळी विद्रोहीच्या सभामंडपात देखील उपस्थितांना आश्चर्य वाटले.
वर्ध्यात 17व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालं. शुक्रवारी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली होती... 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी अचानक भेट दिली.
ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी म्हटलं की, न्यायमूर्ती चपळगावकर यांनी विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देऊन एक मोठा संदेश दिला आहे. साहित्यात विभाजन असू शकत नाही. समाज बदलला पाहिजे असं सर्वांना वाटतं. दोन संमेलन वेगळी झाली तरी हरकत नाही, पण दोघांमध्ये आपुलकी असली पाहिजे, संवाद पाहिजे, येणं जाणं पाहिजे. स्वतः त्यांनी आज येथे येऊन आपल्या प्रत्यक्ष कृतीतून हे करुन दाखवलं. हा मोठा पूल त्यांनी दोन्ही साहित्य संमेलनात उभा केला असल्याचं सांगत त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करायला पाहिजे, अशी भावना बंग यांनी व्यक्त केली.
विद्रोही साहित्य संमेलनाचे कार्य संघटक किशोर ढमाले यांनी म्हटलं की, महात्मा फुले यांनी 1885 यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, हे संमेलन वेगवेगळे का आहे. काय केल्याने समाजात एकी होईल याचे बीज शोधून काढत नाही... तुम्ही उंटावरून शेळ्या हकणारे संमेलन वाले आहात. त्याच सम्मेलनाचे नेतृत्व चपळगावकर करीत आहेत. काय केल्याने एकी निर्माण होईल याचे बीज शोधून काढत नाही. तोवर अखिल भारतीय मराठी संमेलन अजूनही तेच करत आहे. त्यांनी महात्मा फुले यांनी अपमानित केले. ते अजूनही पूर्वीच्याच वाटेने चालले आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला त्यांना देखील यांनी मंचावर बोलावले नाही. प्रस्थापिताविरुद्ध विद्रोह करणे ही काळाची गरज आहे. त्यांचे अध्यक्ष इकडे आले आहे, त्यांचे प्रेक्षक तर आधीच इकडे आले आहेत, असंही ढमाले म्हणाले.