Wardha : वर्ध्यात बोगस बियाणांच्या कारखान्यावर छापा, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त; कृषी आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील म्हसाळा इथं कोट्यवधी रुपयांच्या बोगस बियाणे (Bogus seed) निर्मितीचा कारखानाच आढळून आला आहे.
Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील म्हसाळा इथं कोट्यवधी रुपयांच्या बोगस बियाणे (Bogus seed) निर्मितीचा कारखानाच आढळून आला आहे. शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्या या बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर कृषी आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली आहे. मध्यरात्री झालेल्या या कारवाईत सुमारे दीड कोटी रुपयांचे बोगस बियाणे आढळून आले.
वर्ध्याच्या सेवाग्राम वर्धा टी पॉईंटवरून बरेच ट्रक माल घेऊन जात असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यानंतर शोधाशोध सुरू असताना मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. बिजी थ्री, अंकुर , अजित अशा कपाशीच्या वाणाचे बोगस बियाणांचा साठा आणि बियाणे तयार करण्यासाठीची सामग्री हाती लागली आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या वाणाचे कपाशीचे बियाणे तयार करुन पॉकेट बनवले जात होते. पॉकेट प्रिंट कुठे व्हायचे आणि हे बियाणे नेमके कुठून यायचे याचा तपास केल्यास आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार
पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. अकोल्यातील दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे बोगस बियाणे असतील, ज्यांच्याकडे बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: