Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड स्वत:हून शरण का आला?; कोर्टात वकिलाच्या युक्तिवादानंतर उलगडलं रहस्य
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड काल अचानाक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात वाल्मिक कराड शरण आला.
Walmik Karad Surrender: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी (Santosh Deshmukh Murder Case) संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराडला (Walmik Karad) 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. रात्री उशीरानं झालेल्या सुनावणीत कराडला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तक्रार ही खंडणीची आहे, पण यात कुठे ही दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा उल्लेख नसून विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये मिळाला असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकीलांनी न्यायालयात केला आहे. तर दुसरीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून तक्रार असून या अनुषंगानं हत्या आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल असल्याचा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केलाय.
वाल्मिक कराड गेल्या 22 दिवासांपासून फरार होता. काल अचानाक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात वाल्मिक कराड शरण आला. यानंतर वाल्मिक कराड स्वत: शरण का आला?, यामागचं नेमकं कारण काय?, अशी चर्चा रंगली आहे. परंतु वाल्मिक कराडने आत्मसमर्पण का पत्कारलं?, याचे संकेत केज न्यायालयात काल रात्री झालेल्या युक्तिवादावरुन मिळत आहे. वाल्मिक कराडच्या वकीलांनी न्यायालयात आरोपी स्वत: हजर झाले, असा युक्तिवाद केला.
न्यायालयात वाल्मिक कराडच्या वकीलांनी कोणता युक्तिवाद केला?
तक्रार ही खंडणीची आहे, पण यात कुठे ही दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा उल्लेख नाही. विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये आहे, तो मिळाला आहे. वाल्मिक कराडच्या ऑफिसमध्ये आल्याचे सांगितले पण कधी बोलावले हे स्पष्ट नाही. आम्हाला राजकीय बळी ठरवले. वाल्मिक कराडवरील 15 गुन्हे पैकी फक्त एक गुन्हा तोही आंदोलनचा आहे. आम्हाला राजकीय गुंतवले. 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी स्वत: हजर झाले आहेत, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकीलांनी केला. वाल्मिक कराडच्या वकीलांनी आरोपी स्वत:हून शरण आला, कुठे पळून गेला नव्हता, असा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाल्मिक कराडला पुढे जामिन मिळण्यास थोडीफार मदत मिळू शकते, असं सांगितले जात आहे.
वाल्मिक कराड 22 दिवसांपासून नेमका कुठे कुठे गेला?
वाल्मिक कराड पुण्यात शरण आला मात्र तो 22 दिवसांपासून नेमका कुठे कुठे गेला याची माहिती एबीपी माझाला मिळालीय. खंडणीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरात असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यानंतर सुरूवातीचे दिवस तो पुण्यात राहिला. यानंतर साधारण आठ दिवसापूर्वीनंतर तो महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याची माहिती उघड झालीय. त्यानंतर राज्याबाहेर गेल्यावर त्यानं इतर राज्यामध्ये देवदर्शन केलं.