Uddhav Thackeray : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची सभा, राज्यस्तरीय अधिवेशन, काळाराम मंदिर दर्शन, तयारी कुठपर्यंत?
Nashik News : आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. उद्धव ठाकरे हे सोमवारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
Nashik News नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention) आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारी (दि. 22) नाशिकमध्ये (Nashik) दाखल होणार आहेत. राज्यस्तरीय अधिवेशनाची नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ayodhya Ram Mandir Inauguration) न जाता सोमवारी उद्धव ठाकरे हे सायंकाळी पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाचे पूजन करणार आहेत. नंतर ते रामकुंडावर गंगा पूजन करतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.
उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
नाशिक-त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे दोन हजार पदाधिकारी सहभागी होतील. याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल. सभेतील व्यासपीठ उभारणी व संबंधित कामे प्रगतीपथावर आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व स्थळांची पाहणी केली आहे. काळाराम मंदिरातील नियोजन, रामकुंडाकडे येण्याचा मार्ग आदींची माहिती घेण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला उद्धव ठाकरे देणार भेट
प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमधून लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना उशिराने मिळाले. त्या आधीच उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तसेच नाशिकला राज्यस्तरीय अधिवेशन घेणार, असे देखील जाहीर केले होते. राम मंदिर लोकार्पणाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे यांचा काळाराम मंदिरातील दर्शन व पूजेचा कार्यक्रम याआधी निश्चित करण्यात आला होता. आता भगूर येथील सावरकर स्मारकाला देखील उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.
मनसेकडून सकाळी काळाराम मंदिरात महाआरती
नाशिक मनसेच्या वतीने सोमवारी सकाळी 9 वाजता काळाराम मंदिरात महाआरतीचे आयोजन केले गेले आहे. यासोबतच 51 हजार मोतीचूर लाडूंचा नेवैद्य काळारामाला दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसाद म्हणून या लाडूंचे शहरभरात वाटप केले जाणार आहे.
आणखी वाचा