(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दोन हजारच्या नोटांची मागील दोन वर्षांपासून छपाई बंद
मागील दोन वर्षांपासून दोन हजाराच्या नोटा छापल्या जात नाहीत. सरकारच्या मते आरबीआयकडून या संदर्भात कोणत्याही प्रकारची मागणी न झाल्यामुळे नोटा छापणं बंद केले आहे.
नवी दिल्ली: मोदी सरकारने 2016 रोजी नोटबंदीसंबंधी मोठा निर्णय घेतला होता. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सरकारने 500 रूपयाच्या आणि एक हजाराच्या नोटांचे व्यवहार थांबविले होते. तर 500 रूपये आणि दोन हजाराच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्या होत्या. आता सरकारने माहिती दिली आहे की, मागील दोन वर्षांपासून दोन हजारच्या नोटा छापणं बंद केले आहे.
दोन वर्षांपासून 2000 च्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत
अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले की, "मागील दोन वर्षांपासून दोन हजाराच्या नोटा छापणं थांबवण्यात आले आहे". ते पुढे म्हणाले की, नोटा छापण्यापूर्वी आरबीआय आणि सरकार एकमेकांसोबत चर्चा करून नोटा छापण्याचा निर्णय घेत असतात. पण 2019-20 आणि 2020-21 मध्ये एकही नोट छापण्याची सूचना मिळाली नाही.
चलनात कमी झालेल्या 2000 च्या नोटासंदर्भात
सरकारने सांगितले आहे की, नोटांची साठेबाजी थांबविण्यासाठी नोटा छापणं थांबविण्यात आले आहे. अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे की, 30 मार्च 2018 मध्ये 2000 रूपयाच्या 336.2 कोटी नोटा चलनात होत्या. तेच 26 फेब्रुवारी 2021 मध्ये 2000 रूपयांच्या नोटांची संख्या 249.9 कोटी झाली होती. 2000 च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटांविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या.
प्रत्येकवर्षी कमी होत गेली छपाई
2016 मध्ये 2000 च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटा छापणं कमी होत गेलं. आरबीआयच्यामते आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 354 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या होत्या. त्यानंतर आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 11.15 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या. तर 2018-19 मध्ये 4.669 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या आहेत. त्यानंतर एप्रिल 2019 नंतर आतापर्यंत दोन हजारच्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत.