(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑफिसच्या लिफ्टमध्ये 3 तास अडकला कर्मचारी; कंपनीने कापला पगार, नोकरीवरुन काढण्याचीही धमकी
सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याच्या ऑफिसचा अनुभव शेअर केला आहे, ज्यात हा व्यक्ती तब्बल तीन तास ऑफिसच्या लिफ्टमध्ये अडकल्याचं सांगतो. ऑफिसमध्ये उशिरा पंच केल्यामुळे त्याचा पगार देखील कापला गेला.
Weird News: ट्रॅफिकमुळे (Traffic) ऑफिसला पोहोचायला उशीर होणं, सकाळी अलार्म (Alarm) ऐकायला न आल्यामुळे किंवा इतर अशाच काही कारणांमुळे लोकांना ऑफिसला (Office) पोहोचायला उशीर होतो, हे तुम्ही ऐकलं असेल. काही वेळा लोक जाणूनबुजून ऑफिसला उशिरा येतात, तर काही वेळा खऱ्या कारणामुळे त्यांना ऑफिसला पोहोचायला उशीर होतो, यामुळे अनेकदा त्यांना ऐकावंही लागतं. पण एका व्यक्तीसोबत अशी काही घटना घडली आणि त्याचे असे परिणाम झाले की, ते ऐकून तुम्हालाही दया येईल.
ऑफिसच्या लिफ्टमध्ये अडकल्या कारणाने या व्यक्तीला ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला आणि ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याला बरंच ऐकावंही लागलं. हा प्रसंग कर्मचाऱ्याने Reddit वर शेअर केला आहे, जो ऐकून तुम्हालाही त्या ऑफिसवर राग येईल.
नेमकं घडलं काय?
त्याचं झालं असं की, हा कर्मचारी अगदी ठरलेल्या वेळेत ऑफिसमध्ये पोहोचला, पण ऑफिसच्या लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने तो लिफ्टमध्ये अडकून राहिला. तब्बल तीन तास तो लिफ्टमध्ये अडकला होता आणि त्यामुळे ऑफिसमध्ये एन्ट्री करायला त्याला उशीर झाला. उशिरा पोहोचल्यामुळे या कर्मचाऱ्याचा पगार देखील कापण्यात आला.
कर्मचाऱ्याने सांगितलं की, ऑफिसच्या लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने त्याला ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला. हे एक वैध कारण होतं. पण तरीही HR डिपार्टमेंटने कर्मचाऱ्याला अशी वागणूक दिली आणि त्याचा पगार देखील कापला.
तीन तास लिफ्टमध्ये अडकला कर्मचारी
या कर्मचाऱ्याने Reddit वर त्याचा अनुभव सांगताना म्हटलं, 'मी लिफ्टमध्ये होतो. त्यानंतर अचानक वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे मी माझ्या ऑफिसमध्ये पोहोचू शकलो नाही. त्यामुळे मी त्यांना फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला. अनेक प्रयत्नांनंतर मी एचआरशी संपर्क साधू शकलो. मी त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी तातडीने एका मेंटेनन्स टेक्निशियनला लिफ्टच्या दुरुस्तीसाठी पाठवलं. लिफ्ट दुरुस्त करून मला तिथून बाहेर काढण्यासाठी त्यांना 3 तास लागले.'
पूर्ण दिवसासाठी धरलं गैरहजर
कर्मचाऱ्याने पुढे सांगितलं की, लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर त्याला एचआरने म्हटलं की, तुला ऑफिसला पोहोचायला उशीर झाला आहे. उशिरा आल्याचं सांगून त्याचा पगार कापण्यात आला. केवळ त्याचा पगारच कापला गेला नाही, तर त्या दिवसासाठी त्याची गैरहजेरी लावण्यात आली. त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला. मात्र, ऑफिसकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मॅनेजरने त्याला घरी न जाता ऑफिसमध्येच काम करण्याचा सल्ला दिला.
बहाणा बनवत असल्याचा आरोप
यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की, जर त्याची हजेरी लावण्यात येणार असेल तरच तो काम करेल. अन्यथा तो घरी परत जाईल. हे ऐकल्यानंतर मॅनेजर संतापला आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्याने त्याच्या कामावर टीका केली आणि कर्मचाऱ्यावर बहाणा करत अल्याचा आरोप केला. शेवटी त्या माणसाला स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी लिफ्टचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावे लागले.
हेही वाचा:
CCTV : नातेवाईक सोफ्यावर बंदूक विसरले, चिमुकलीने खेळता खेळता स्वत:वरच झाडली गोळी