EV Scooter: ऐकावं ते नवलंच! पठ्ठ्याने 10 रुपयांच्या नाण्यांनी खरेदी केली स्वप्नातली बाईक, कंपनीच्या CEO ची सोशल मीडीयावर पोस्ट
Electric Scooter : त्याची ड्रीम बाईक खरेदी करण्यासाठी हा माणूस चक्क 10 रुपयांची नाणी घेऊन तो शोरुममध्ये पोहचला.
Electric Scooter : आपल्या स्वप्नातली गाडी घेण्यासाठी लोकं मोठ्या मेहनतीने पैसे कमावतात, जयपूर (Jaipur), राजस्थानमधील (Rajasthan) एका व्यक्तीला एथर 450 इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची होती, ज्याची किंमत साधारण एक ते दीड लाख पर्यंत आहे, ही बाईक घेण्यासाठी हा माणूस चक्क 10 रुपयांची नाणी घेऊन तो शोरुममध्ये पोहचला. त्याने या इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण किंमत फक्त ₹10 च्या नाण्यांमध्ये भरली. एथर एनर्जी कंपनीचे सीईओ तरुण मेहता यांनी सोशल मीडीयावर एक फोटो शेअर करून ही माहिती दिली. नेमकं काय घडलं वाचा..
A new Ather owner just bought himself a 450 in Jaipur
— Tarun Mehta (@tarunsmehta) February 17, 2024
... all with 10Re coins! pic.twitter.com/VWoOJiQey2
तरुण मेहता यांची सोशल मीडियावर पोस्ट
तरुण मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या छायाचित्रात शोरूमचे अधिकारी या व्यक्तीला इलेक्ट्रिक स्कूटरची चावी देताना दिसत आहेत. तरुण मेहताने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "एथरच्या एका नवीन ग्राहकाने जयपूरमध्ये स्वत:साठी 450 सीरीजची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली. यासाठी त्याने 10 रुपयांच्या नाण्यांमध्ये पैसे दिले." या चित्रात ₹10 च्या नाण्यांचे अनेक छोट्या पिशव्या दिसू शकतात.
एथर 450 सीरीजमध्ये तीन मॉडेल्स
तरुण मेहता यांनी Aether 450 मालिकेतील कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकाने खरेदी केली आहे. हे सांगितले नाही. पण माहितीनुसार, बेंगळुरू स्थित EV स्टार्टअप कंपनी एथर 450 सीरीजमध्ये 3 मॉडेल ऑफर करते. हे तीन मॉडेल्स आहेत – Ather 450 Apex, Ather 450X आणि Ather 450S. या तीन मॉडेल्सची किंमत ₹ 1.10 लाख ते ₹ 1.45 लाख (जयपूरमधील एक्स-शोरूम किंमत) आहे. त्याची ऑन-रोड किंमत देखील ₹1.75 लाखांपर्यंत पोहोचू शकते.
शेअर विक्रीद्वारे $400 दशलक्ष उभारण्याच्या तयारीत
सिंगापूर GIC आणि Flipkart सह-संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी देखील Ather मध्ये गुंतवणूक केली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्या या कंपनीचे बाजार मूल्य सुमारे 739.4 दशलक्ष डॉलर्स आहे. केंद्र सरकारचा अंदाज आहे की, 2030 सालापर्यंत भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर वाहनांची संख्या 60-70% पर्यंत पोहोचू शकते. सध्या ही संख्या 4.7% वर आहे. एथर एनर्जी शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याची तयारी करत असल्याचेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. यासाठी कंपनी संभाव्य गुंतवणूक बँकांशीही बोलणी करत आहे. ही बंगलोर स्थित कंपनी शेअर विक्रीद्वारे $400 दशलक्ष उभारण्याच्या तयारीत आहे.