''पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले अन् सूर्यदेवाला शांत केलं, आज वारं वाहतंय''; खासदार महोदयांचा गजब दावा
कन्याकुमारीत दोन दिवस ते धान्य-साधनेत मग्न झाले असून त्यांच्या ध्यानसाधनेचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवी दिल्ली : देशातील 7 व्या आणि अंतिम टप्प्यात आज मतदान होत असून 57 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहारसह एकूण 8 राज्यात आणि ओडिशातील विधानसभेच्या 42 जागांसाठी आज मतदान होत आहे. गोरखपूर मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रवि किशन यांनी मतदानाचा हक्क बजावला. रवि किशन (Ravi Kishan) हे महायुतीकडून गोरखपूर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यामुळे, या मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले असता, त्यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. आम्ही जनतेचे सेवक आहोत, व्हीआयपी नाही. म्हणून मी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावल्याचं त्यांनी म्हटलं. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाच्या (Voting) उत्साही वातावरणावर समाधान व्यक्त केले आहे.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला गेले आहेत. कन्याकुमारीत दोन दिवस ते धान्य-साधनेत मग्न झाले असून त्यांच्या ध्यानसाधनेचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोदींच्या या ध्यान-साधनेचा संबंध खासदार रवि किशन यांनी कमी झालेल्या उष्णतेशी जोडला आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा आज पार पडत असल्याने मतदार सकाळपासूनच मतदानाच्या रांगेत उभे राहून कर्तव्य बजावत आहेत. खासदार रवि किशन उमेदवार असलेल्या गोरखपूरमध्येही उत्साहात मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रवि किशन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये, मतदानाच्या उत्साही वातावरणावर त्यांनी भाष्य केलं. तर, तिकडे पंतप्रधान मोदी ध्यान धारणेला बसले, आणि इकडे उन्हाचा पारा कमी झाला. त्यामुळे, मतदार घराबाहेर पडून मतदान करत असल्याचं रवि किशन यांनी म्हटलं.
काय म्हणाले खासदार रवि किशन
ऐतिहासिक आहे, वातावरण चांगलय, तिकडे पंतप्रधान ध्यान-साधनेला बसले आणि इकडे सूर्यदेवाला शांत केलं, हे ऐतिहासिक आहे. कारण, कडाक्याच्या उन्हात आज वारं वाहतय. हा रामराज्यासाठी सर्वात मोठा संकेत आहे आणि तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनून विराट रुपात येतील त्याचा, असे खासदार रवि किशन यांनी म्हटलं आहे.
कन्याकुमारीत ध्यान-साधना
निवडणूक प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान करण्यासाठी बसले आहेत. साधारण 30 मे ते आज 1 जूनपर्यंत ही ध्यान साधना असणार आहेत. खरं सांगायचं म्हणजे पंतप्रधानांनाही भारतातील सर्वात सुंदर ठिकाणी ध्यान करण्याचा मोह आवरता आला नाही. कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा मोठा पुतळा बसवण्यात आला आहे, ज्यासमोर पीएम मोदी ध्यान करत आहेत.
1892 मध्ये स्वामी विवेकानंद तीन दिवस ध्यानस्थ बसले होते..
पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी ध्यान करत आहेत ते ठिकाण एका छोट्या बेटावर आहे, जे कन्याकुमारीमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. याच ठिकाणी 1892 मध्ये स्वामी विवेकानंद तीन दिवस ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते. या खडकावर एका पायावर उभे राहून देवी कन्याकुमारी यांनी कठोर तपश्चर्या केली होती, असेही मानले जाते. विवेकानंद मंडपम आणि श्रीपाद मंडपम रॉक मेमोरियलमध्ये आहेत. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. ऑक्टोबर ते मार्च हा काळ या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ आहे.