Tiger Attack Chandrapur: वाघांची दहशत कायम! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मूल तालुक्यातील भादूरणा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात (Tiger Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील भादूरणा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूमिका दीपक भेंदारे (28) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. त्या आपल्या पती आणि गावातील इतर लोकांसोबत सकाळी जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. अशातच जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या 3 महिलांचा तर काल(11 मे) मूल तालुक्यातील महादवाडी येथे एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. परिणामी, वाघाच्या हल्ल्यात गेल्या 3 दिवसात तेंदूपत्ता तोडणाऱ्या 5 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मृतकांच्या कुटुंबियांचे विजय वडेट्टीवार यांनी केलं सांत्वन
दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 3 महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन मृतकांच्या कुटुंबियांचे काँग्रेस गटनेते आणि स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांत्वन केलं आहे. सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या 3 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात काल(11 मे) मृत्यू झाला होता. यावेळी अंत्यसंस्कार आटोपताच वडेट्टीवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची आणि अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये, याकरिता विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अजून किती नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
फोडणीचा तडका उडाला आणि हॉटेल किचन जळून खाक
फोडणीचा तडका देत असताना तप्त झालेल्या तेलानं अचानक भडका घेतला. यामुळं किचनमध्ये मोठी आग पसरली. बघता- बघता किचनमध्ये असलेल्या अन्य साहित्यानं पेट घेतल्यानं आगीनं पेट घेतला. भंडारा नगरपालिकेचं अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यानं वेळीच आग आटोक्यात आली. ही दुर्घटना भंडारा शहरातील गजबजलेल्या वसाहतीत असलेल्या बस स्थानकासमोरील हॉटेल शिवम इथं घडली. वेळीचं आगीवर नियंत्रण मिळविल्यानं मोठी दुर्घटना टळली.
हे ही वाचा























