Thane : ठाण्याचे ठाणेदार कोण? ठाण्याची लोकसभा म्हाळगींच्या भाजपची की दिघेंच्या शिवसेनेची? तिढा कायम
Thane Lok Sabha Election : भाजपची वैचारिक पायाभरणी करणारे रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी एकेकाळी ठाण्याचं खासदारपद भूषवलं होतं. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतला होता.
ठाणे : महायुतीने राज्यात 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणल्याचं लक्ष्य ठेवलं असून त्यासाठी जोरदार तयारीही सुरू केली आहे. पण राज्यातील काही जागांवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये तिढा असल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्याच्या जागेवर (Thane Lok Sabha Election) भाजपने दावा केल्याची माहिती आहे. भाजपची वैचारिक पायाभरणी करणारे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी ठाण्याचं प्रतिनिधीत्व केल होतं. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याकडे घेण्यासाठी भाजप सरसावली आहे.
नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. त्यांच्यासह देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान असे भाजपचे सगळे ताकदीचे नेते दिल्लीत भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीवर पहाटे चारपर्यंत चर्चा करत होते. जवळपास 10 ते 12 तास चाललेल्या या बैठकीत देशभरातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा झाली. परंतु महाराष्ट्रातील लोकसभा जागांवर कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.
ठाण्यात कोणाच्या नावाचा 'विचार'
महाराष्ट्रातील जागांवर भाजपकडून मित्रपक्षांसोबत म्हणजेच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह आधी चर्चा केली जाणार आहे. पण महायुतीच्या जागावाटपात अडथळा ठरतेय ती ठाण्याची लोकसभा.
भाजपची वैचारिक पायाभरणी करणारे खासदारांनी प्रतिनिधीत्व केलं
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ होता. भाजपाची वैचारिक पायाभरणी करणारे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे असे खासदार निवडून आणलेला भाजपच्या वैभवशाली परंपरेचा वारसा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. शिंदेच्या सोबत ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचार आले नाहीत, राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याला मिळावा असा मतप्रवाह भाजपात आहे.
ठाण्याचा ठाणेदार कोण?
1977 - रामभाऊ म्हाळगी (जनसंघ )
व्होट शेअर - 59 टक्के
1980 - रामभाऊ म्हाळगी (जनसंघ )
व्होट शेअर - 39 टक्के
1984 - शांताराम घोलप (काँग्रेस)
व्होट शेअर - 58.73 टक्के
1989 - राम कापसे (भाजप )
व्होट शेअर - 53.57 टक्के
1991 - राम कापसे (भाजप)
व्होट शेअर - 47.24 टक्के
1996 साली युतीच्या जागावाटपात बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी मागून घेतला. तोपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे होता. त्यानंतर 1996 ते 2009 या काळात शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे खासदार होते.
2009 - गणेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस
2014-2024 - राजन विचारे, शिवसेना
सध्या राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. त्यामुळे आपल्या वैचारिक वारासदारांचा वारसा लाभलेला मतदारसंघ पुन्हा मिळेल अशी संधी भाजपला दिसतेय.
दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे हे समीकरण सर्वश्रुत आहे. शिवसेनेनेच मतदारसंघ असल्यामुळे ठाण्याची लोकसभा आपल्याला मिळावी यासाठी शिवसेनेने कंबर कसलीय.
सर्वच अडचणींवर उपाय शोधण्यासाठी प्रसिद्ध असणारे भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस ठाण्याच्या किल्लेदारपदावरून सुरु असलेला वाद कसा सोडवणार हे पाहणे रंजक ठरेल .
ही बातमी वाचा :