लाडक्या बैलानेच घेतला मालकाचा जीव, बैलानेही सोडले प्राण, बदलापूरमध्ये हृदयद्रावक घटना
बदलापूरमधील (Badlapur) वालीवली (Valivali) गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या विजय म्हात्रे यांना त्यांच्याच बैलाने ठार केले आहे.
Owner dies in bull attack : बदलापूरमधील (Badlapur) वालीवली (Valivali) गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या विजय म्हात्रे यांना त्यांच्याच बैलाने ठार केले आहे. त्यानंतर काही तासातच या बैलाचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून या घटनेमुळे संपूर्ण वालीवली गावात शोककळा पसरली आहे.
मृत विजय म्हात्रे हे कराटे आणि स्केटिंगमध्ये होते. बदलापूर येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. विजय म्हात्रे यांना बैलांच्या शर्यतीची खूप आवड होती. त्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी हा बैल खरेदी केला होता. विजय म्हात्रे हे स्वतः बैलांची काळजी गेत होते. त्यांच्या चाऱ्यापाण्याची काळजी घेत होते. शर्यतीचा बैल असल्याने त्याचा चारा चांगला आणि महाग होता. विजय म्हात्रे यांनी मोठ्या उत्साहाने त्यांची काळजी घेतली होती. त्यांचा बैल चालवण्याचा आणि गाडी चालवण्याचा रोजचा अभ्यास होता.
नेमकी घटना घडली कशी?
मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास विजय म्हात्रे हे बैल त्यांच्या घराजवळील गोठ्यात घेऊन गेले. रात्री 8.30 वाजेपर्यंत विजय म्हात्रे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. यावेळी विजय म्हात्रे हे घरापासून काही अंतरावर शेतात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या अंगावर बैलानं हल्ला केलेल्या जखमा होत्या. पोटात मोठी जखम झाल्याने विजय यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. सलग 3 ते 4 तास हल्ला करत बैलाने मालकाचा जीव घेतल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बदलापूरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यानंतर काही तासातच या बैलाचाही मृत्यू झाला आहे.
बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीसाठी अनेक ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणत बैलांचं संगोपण करतात. तसेच काही नोकरादर देखील मोठ्या प्रमाणात खिलारी जातीच्या बैलाचं संगोपन करतात. राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलांच्या शर्यती होतात. या शर्यतीसाठी हौशी लोक आपापले बैल घेऊन जात असतात. शर्यतीसाठी सांभाळण्यात येणाऱ्या बैलांच्या संगोपणाचा खर्च देखील मोठा असतो. दरम्यान, या बैलांची सांभाळणी करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. कारण शर्यतीच्या बैलांना कोणत्याही प्रकारचे काम लावलं जात नाही. त्यामुळं काही वेळेला असे बैल हल्ला करण्याची शक्यता असते. असाच काहीसा प्रकार बदलापूरमधील वालीवली गावात घडला आहे.