मुंबईत पावसाचा जोर, शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर; मराठवाड्यात 6 जणांचा मृत्यू, मिल्ट्री पथकही पोहोचले
ठाण्यात सकाळी 11 ते 12.30 दरम्यान सर्वाधिक म्हणजे 16.26 मिमी पाऊस पडला आहे, तर यंदाच्या वर्षी 1 हजार 947 मिमी पाऊस पडला आहे.

मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार (Rain) पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्यात पूराचे पाणी आल्याने चक्क 50 म्हशी दगावल्याची दुर्घटना घडली. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही नद्या-नाले भरुन वाहत आहेत. दुसरीकडे कोकणसह मुंबईतही धुव्वादार पाऊस सुरू असून रस्त्यांना नद्याचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतही (mumbai) पावसाचा जोर सकाळपासूनच आहे. ठाण्यात अवघ्या 4 तासात 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना (School) सुट्टी जाहीर केली आहे. ठाण्यात 18 आणि 19 ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तर, नवी मुंबईतही शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.
ठाण्यात सकाळी 11 ते 12.30 दरम्यान सर्वाधिक म्हणजे 16.26 मिमी पाऊस पडला आहे, तर यंदाच्या वर्षी 1 हजार 947 मिमी पाऊस पडला आहे. ठाण्यातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील 48 तासाचा अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नवी मुंबई महापालिकेकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, पालिका शाळेबरोबर शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असून पावसाचा जोर पाहता पालिकेने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.
मुंबईत मागील 6 तासात 170 मिमी पाऊस झाला असून चेंबूरमध्ये 6 तासात सर्वाधिक 177 मिमी पाऊस झालाय. पावसामुळे 14 ठिकाणी मुंबई लोकलची वाहतूक धीम्या गतीनं होत होती. लोकल ट्रेन बंद झाल्या नाहीत, मात्र स्पीड कमी झाला आहे. तसेच, पुढील 10-12 तास तीव्र पाऊस मुंबईत होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, दुपारी 4 नंतर लोकांना मंत्रालयातून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी 6-6.30 नंतर हायटाईड आहे, आज आणि उद्या मुंबईत मोठा पाऊस असेल, त्यामुळे लोकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासानाच्यावतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, जे अलर्ट संध्याकाळी येतील त्या आधारे मुंबईत उद्याच्या शाळेसंदर्भात निर्णय होईल, अशीही माहिती आहे.
मराठवाड्यात 6 जणांचा मृत्यू
मराठवाड्यात आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 57 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, तसेच पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यास शाळांना सुट्या देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. बीड, नांदेड, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली असून त्यांनी मराठवाड्याचा आढावा घेतला आहे. मराठवाड्यातील बीड 2, नांदेड 3, आणि हिंगोलीत 1 जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मराठवाड्यात मदतीसाठी अधिकची कुमूक मागविण्यात आली असून मिल्ट्री देखील मागवली आहे. पुण्यातून 20 लोकांची टीम मागवली असून, त्यांना नांदेडला पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, NDRF चे एक पथक बीडला आहे. तर SDRF चे 2 पथक नांदेडला आहेत, मिल्ट्री पथकही नांदेडला आहे.
तात्काळ मदतीसाठी संपर्क क्रमांक
सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. अधिकारी व कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथके प्रत्यक्ष मैदानात तैनात आहेत. पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही म्हटले आहे.























