Avinash Jadhav : मनसेच्या अविनाश जाधव यांचा राजीनामा, पराभवाची जबाबदारी स्वीकारली
Avinash Jadhav Resigns MNS : ठाण्यातून मनसेच्या अविनाश जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आलेल्या अपयशामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. अविनाश जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे असं अविनाश जाधव यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
अविनाश जाधव हे ठाण्यातून निवडणूक लढवत होते. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. तसेच राज्यभरात मनसेचे 128 उमेदवार उभे होते. त्या सर्वांचा पराभव झाला आहे.
ईव्हीएमविरोधात पुरावे गोळा करण्याचे आदेश
विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात आत्मचिंतन बैठक घेतली. सर्व पराभूत उमेदवारांशी चर्चा करून राज ठाकरेंनी त्यांची मतं जाणून घेतली. या बैठकीत काही मनसे उमेदवारांकडून ईव्हीएमवरही संशय उपस्थित करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम विरोधातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अविनाश जाधव यांचा आरोप
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. महाविकास आघाडीसह इतर पक्षांना विधानसभेला मोठा फटका बसला. राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेण्यात आले आहेत. त्याबाबत अनेक उमेदवारांनी तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिल्या आहेत. मोठ्या जोमाने निवडणुकीला सामोरं गेलेल्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. मनसेने देखील आता ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांता ईव्हीएमवर आक्षेप
मागच्या काही दिवसापासून जे व्हिडीओ समोर येत आहेत. ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे असा आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दहा-दहा वर्षे जे आमदार भेटत नव्हते, ते आमदार एकेक लाखाच्या मतांनी निवडून आले आहेत. ईव्हीएम शिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे. एवढा मोठा विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष कितीही एकत्र आला तरी काही होणार नाही. देशात काहीतरी चुकीचं चाललंय हे आता कळलं पाहिजे. अमेरिका सारख्या देशात जर बॅलेटवर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजे असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.
लोकसभेवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र त्याची परतफेड करताना महायुतीने विधानसभेत मनसेची फसवणूक केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला.