(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण डोंबिवलीमध्ये महागड्या सायकल चोरी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय,सायकल चोरटा सीसीटीव्हीत कैद
Kalyan Dombivali News : व्यायामासाठी महागड्या सायकलींचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने उच्चभ्रू सोसायटीमधून सायकल चोरीच्या घटना समोर येत आहे.
Kalyan Dombivali News : कल्याण डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivali) सध्या सायकल (Cycle) चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महागड्या सायकल चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान यामुळे कल्याण डोंबिवलीतील (Dombivali) नागरिक हैराण झाले आहेत. शनिवार (6 जुलै) रोजी रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय गॅलक्सी सोसायटीमध्ये महागडी सायकल चोरीला गेली. हाच सायकल चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या प्रमाणामध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यावर आळा घालण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. त्यातच आता सायकल चोरीच्या घटनांनी देखील पोलीस हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान महागड्या सायकली चोरट्याचा सीसीटीव्ही अशोक सोलंकी या गृहस्थांनी पोलिसांसमोर पुरावा म्हणून सादर केले आहेत. तसेच बाजारपेठ पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं ?
कल्याण पश्चिम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड एका इमारतीत राहणाऱ्या अशोक सोलंकी यांची महागडी सायकल चोरीला गेली. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यांना पुरावा म्हणून अशोक सोलंकी यांनी पोलिसांना सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग सादर केले आहे.त्यामुळे आता तरी या चोरट्यांना आळा बसणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी काही अल्पवयीन मुलांना सायकल चोरी करताना पकडले होते. परंतु त्यानंतरही चोरीचे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं म्हटलं जात आहे.
शहरातील जीवनशैली बदलली असल्यामुळे सध्या प्रत्येकजण फिटनेस फंड्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे लोकं सध्या सायकल चालवणं जास्त पसंत करतात. त्यासाठी बाजारातून महागड्या सायकली मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. म्हणूनच सध्या या चोरांनी महागड्या सायकलींची चोरी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं म्हटलं जात आहे.
आतापर्यंत कुठे कुठे झाली सायकल चोरी
डोंबिवलीमधील रामनगर पोलीस स्थानकात काही महिन्यांपासून सायकल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रामनगर पोलिसांनी दिवा येथून दोन जणांना अटक केली आहे. तसचे या आरोपींकडून पोलिसांनी जवळपास दीड लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर डोंबिवली विष्णु नगर येथील सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर कल्याणमधील खडकपाडा येथून एका उच्चभ्रू सोसायटीमधून वॉचमनला अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे यामध्ये 14 वर्षांची मुलं महागड्या सायकल चोरी करत असल्याचं समोर आलं होतं. तर हा वॉचमन या मुलांना महागड्या सायकल विकण्याचं काम करायला लावत असल्याचं पोलिसांनी उघड केलं आहे.