Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; सात महिन्यांत 200 अपघात, 95 जणांचा बळी
Palghar News: सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. पालघरजवळून जाणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखील त्याला अपवाद नाही, अवघ्या तीन महिन्यांत महामार्गावर 200 अपघात झाले आहेत.
Palghar: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Ahmedabad National Highway) हा सध्या स्थानिकांसह वाहन, चालक आणि प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनतो आहे. 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023 या सात महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल 200 अपघात (Accident) झाले असून यामध्ये 95 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गांच्या दुरावस्थांकडे लक्ष देऊन राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
'या' कारणांमुळे होत आहेत अपघात
गुजरातच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील अच्छाड ते मुंबईच्या सीमेवर असलेल्या घोडबंदर या दरम्यानच्या जवळपास 100 किलोमीटरच्या महामार्गावर हे 200 अपघात घडले असून यामध्ये 95 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तब्बल 188 जण अपघातात जखमी झाले आहेत. महामार्गावर असलेले अपघात प्रवण क्षेत्र , महामार्गावरील खड्डे, गाड्यांना कट मारणं, भरधाव वेगात चालणारी वाहनं अशा विविध कारणांमुळे हे 200 अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
टोल वसुली होत असूनही अपुऱ्या सुविधा
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत डहाणूतील चारोटी आणि वसई तालुक्याच्या हद्दीतील खानिवडे अशा दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणांवर टोल वसुली केली जात असली तरी सुद्धा महामार्गावर अपुऱ्या सुविधा पाहायला मिळत आहेत. टोल वसुली होत असूनही महामार्गावर खड्डे आहेत, प्रवासी आणि वाहन-चालकांना पुरवल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधा ह्या जैसे थेच पाहायला मिळतात. त्यामुळे दिवसाला हजारो वाहनांना ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेला हा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक, वाहन-चालक आणि प्रवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गालाही खड्ड्यांचं ग्रहण
आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान वापरून आणि 55 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम काही महिने झाले असूनही महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर कुठे खड्डे पडत आहेत, तर कुठे पुलांनाच भेगा पडत आहेत आणि त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण होते. या खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे.
हेही वाचा: