Heavy Rain in Mumbai & Thane: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, दुपारी समुद्राला भरती; लोकल ट्रेनला तुफान गर्दी
Mumbai Rains: पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशीराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे मार्गावरील ट्रेन 10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.
मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून या सर्व भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी (Heavy Rain) बरसत आहेत. त्यामुळे शनिवारची सकाळ कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कसरतीची ठरणार, हे स्पष्ट झाले होते. आज सकाळ उजाडल्यानंतरही मुंबई आणि ठाण्यातील पावसाचा (Thane Rain) जोर कायम आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबई शहरात 91 मिमी, पूर्व उपनगरात 87 मिमी आणि पश्चिम उपनगरात 93 मिमी पाऊस पडला आहे.
सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होताना दिसत आहे. याशिवाय, मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला आहे. मुंबईत मालाड सबवे, शेल कॉलनी, शितल सिनेमा,कुर्ला आणि आरे परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने इथली बेस्टची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
आज दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.24 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तोपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील पाण्याचा निचरा होणे कठीण होईल. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज दिवसभर मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
ठाण्यात अवघ्या चार तासांमध्ये 76.7 मिमी पावसाची नोंद
ठाण्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यात पहाटे 4.30 पासून 8.30 वाजेपर्यंत 76.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील वंदना डेपोच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे ठाणे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तर मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. याशिवाय, भिवंडी परिसरातही जोरदार पावसामुळे मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. पाणी तुंबल्याने भिवंडी मार्केट परिसरात गुडगाभर पाणी साठले आहे.
कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस
कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरात शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कल्याण स्टेशन परिसरातील केडीएमसीच्या वाहन तळासमोरील रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे.
लोकल ट्रेन सेवा विलंबाने
सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वेच्या लोकल या दहा मिनिटे सध्या धावत आहेत. दुसरीकडे हार्बर रेल्वेचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील 15 मिनिटे उशिराने दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे. सकाळपासून पाऊस कोसळत असल्याने रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर असून साडे अकराच्या दरम्यान असलेल्या मोठ्या भरतीच्या वेळेस ट्रॅकवर पाणी साचू नये यासाठी दक्षता घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
आणखी वाचा
मालाड, भिवंडी ते अंधेरीपर्यंत कोसळधारा, मुंबईतील मुसळधार पावसाचा 'आँखो देखा हाल' सांगणारे 10 फोटो!