Dahihandi : दहीहंडीत बक्षीस जिंकलं, पिकनिक ठरली; सेलिब्रेशननंतर काही तासांतच भिवंडीतील 2 गोविंदांचा मृत्यू
Dahihandi : गोविंदा (Dahihandi) पथकातील मित्रांच्या पिकनिक प्लॅननुसार 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी हे पथक भिवंडीहून (Bhiwandi) वाशिंदला रवाना झाले.
Dahihandi : ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी शहरात नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषात सहभागी झालेल्या रामसेतू गोविंदा पथकाने मिळवलेल्या बक्षीसाच्या रकमेतून पिकनिकचा आनंद घेण्यासाठी वाशिंद येथील एका फॉर्महाऊसवर पथकातील गोविंदा गेले होते. मात्र, या आनंदाच्या क्षणांचे दु:खात रूपांतर झाले, कारण परतीच्या प्रवासात दोन गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील संग्रिला हॉटेलजवळ आज पहाटेच्या सुमारास घडली. गेल्या आठवड्यात भिवंडी शहरातील विविध भागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. रामसेतू गोविंदा पथकाने यावेळी उत्कृष्ट कामगिरी करत मोठी बक्षीस रक्कम जिंकली होती. या जिंकलेल्या रकमेतून पथकाने आपल्या मित्रांसह वाशिंद येथील शंकर टावरे यांच्या फॉर्महाऊसवर पिकनिक साजरी करण्याचे ठरवले.
गोविंदा (Dahihandi) पथकातील मित्रांच्या पिकनिक प्लॅननुसार 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी हे पथक भिवंडीहून (Bhiwandi) वाशिंदला रवाना झाले. तिथे त्यांनी एकत्रितपणे 24 तासांपेक्षा अधिक वेळ घालवून हसत-खेळत सेलिब्रेशन केले. मात्र, परतीच्या प्रवासानंतर झालेल्या अपघातात आशिष ललजीत वर्मा (14) व खुर्शीद आलम नजीर अली (18) या दोन गोविंदांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. गोविंदा (Govinda) पथकाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर आज पहाटे साडेचारच्या सुमारास हे तरुण आपल्या वाहनांवरून भिवंडीला एक्टिवा स्कूटरवरून परतत असताना, अशोक नगर येथील टावरे कंपाउंडमधील आशिष लालजीत वर्मा (14) आणि कारीवली गुप्ता कंपाउंडमधील खुर्शीद आलम नजीर अली (18) हे दोघे आपल्या तिसऱ्या मित्रासह भिवंडीच्या दिशेने जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील संग्रिला हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या एक्टिवाला जबर धडक (Accident) दिली. ज्यामुळे आशिष आणि खुर्शीद यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा मित्र सुदैवाने याअपघातातून बचावला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. PI दादासाहेब एडके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष गिरी, PSI तोडासे, HC वाठारकर, आणि ASI वानखेडे यांनी अपघाताचा पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवले. पोस्टमार्टमनंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. रामसेतू गोविंदा पथकाच्या आनंदी उत्सवाचे असे दु:खद अंत झाल्याने भिवंडी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून, अपघाताची अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.
हेही वाचा
भाजप आमदाराने गोळीबार केलेला वाद पुन्हा उफळला; बिल्डर गुंडांसह आला, पोलिसांनी घेतली धाव