भाजप आमदाराने गोळीबार केलेला वाद पुन्हा उफळला; बिल्डर गुंडांसह आला, पोलिसांनी घेतली धाव
अंबरनाथमधील याच जागेवरून आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.
ठाणे : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्येच थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते, तसेच विधानसभा सभागृहातही याचे पडसाद उमटले होते. शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि आमदार भाजप गायकवाड यांच्यात एका जमिनीवरुन वाद निर्माण झाला होता. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील या जागेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. कारण, संबंधित जागेचा ताबा घेण्यासाठी एक बिल्डर चक्क गावगुंडांसह, बंदुक आणि हत्यारं घेऊन जमिनीच्या स्थळावर पोहोचला होता. याबाबत माहिती मिळताच महेश गायकवाड यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळ गाठले. त्यानंतर, पोलिसांनी हत्यारासह गुंडांना ताब्यात घेतलं आहे.
अंबरनाथमधील याच जागेवरून आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेला आता 6 महिने होऊन गेले आहेत, तर आमदार गायकवाड हे अद्यापही तुरुंगात आहेत. मात्र, या घटनेला सहा महिने होत असल्यानंतरही तोच वाद नव्याने निर्माण झाला आहे. येतील जागेची मोजणी करायची नाही, असा आदेश भूमी अभिलेख विभागाचा असतानाही, या जागेचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या बिल्डर आणि त्याच्या शंभरहून अधिक हत्यार बंद गुंडांनी येथील शेतकऱ्यांना मारहाण केली. यावेळी, काही शेतकऱ्यांनी कल्याण शिवसेना (Shivsena) शहर प्रमुख महेश गायकवाड यांना संपर्क केला. त्यानंतर, महेश गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि हत्यारबंद असलेल्या गुंडांना पकडून पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले. त्यामुळे, मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी, पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलं असून घटनेची चौकशी केली जात आहे.
काय आहे प्रकरण
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
पोलिस स्टेशनमध्ये काय घडलं होतं
आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड उल्हासनगर येथील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात आले होते. तसंच शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील देखील तिथं आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी वैभव यांनी पुन्हा आमदारांशी फोनवरून संपर्क साधत पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड गायकवाड देखील 'हिल लाइन' पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी गणपत गायकवाडसह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात जमा झाले. आमदार गायकवाड पोलीस ठाण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये गेले. त्या केबिनमध्ये आगोदरच महेश गायकवाडसह त्यांचा साथीदार राहुल पाटील उपस्थित होते. तिघं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप केबिनमध्ये चर्चा करत असताना पुन्हा गणपत गायकवाड यांची महेश पाटील यांच्यात वाद झाले. अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेव्हा गायकवाड यांनी त्यांच्याजवळील बंदुकीतून महेश गायकवाडसह राहुल पाटील यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गायकवाड यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्यानतंर त्यांच्या खासगी अंगरक्षकानं त्यांच्याजवळील बंदुकीतून गोळीबार सुरू केला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं अंगरक्षकाची बंदूक हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला, असं देखील शिंदे म्हणाले.