Girish Mahajan : आंदोलकांना 8 वेळा समजावलं, काही जणांना राजकारण करायचं होतं, लाठीचार्जनंतर गिरीश महाजन स्पष्टच बोलले
Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या आडून काही जणांना राजकारण करायचं होतं, असा आरोप विरोधकांवर केला.
बदलापूर (ठाणे) : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलक बदलापूर रेल्वे स्टेशनला जमले होते. बदलापूर रेल्वे स्टेशनला आंदोलक 10 तासांहून अधिक काळ रुळांवर असल्यानं रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. आंदोलकांकडून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती. पोलीस अधिकारी आणि मंत्री गिरीश महाजन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करुन रेल्वे ट्रॅक रिकामा केला. आंदोलकांनी यावेळी प्रत्युत्तर देत दगडफेक केली, पोलिसांची गाडी देखील फोडण्यात आली. या सर्व प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी भूमिका मांडली आहे. आंदोलकांना आठवेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेआडून त्यांना राजकारण करायचं होतं, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.
आम्ही हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. लाखो लोकं जाणार कशी यामुळं थोडं छोटंस ऑपरेशन करण्यात आलं, असं गिरीश महाजन म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पोटात गोळा उठललेला आहे. त्या योजनेचा आणि या घटनेचा काही संबंध नाही पण सुंदर पोस्टर छापून आणले आणि तुमच्या कॅमेऱ्या समोर दिवसभर दहा तास, बारा तास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं गिरीश महाजन म्हणाले.
मला वाटतं विरोधकांनी इतकी पातळी सोडावी याची कमाल वाटते ही घटना कुठली आहे, त्याची तीव्रता काय, गांभीर्य काय, हे आपण पाहत नाही. आपला राजकीय फायदा कसा होईल यासाठी ठराविक लोकांना इथं सोडून देण्यात आलं. तुम्ही आता बघा आंदोलनकर्त्यांमध्ये स्थानिक लोकं किती होती आणि बाहेरची किती होती हे सिद्ध होईल, असं गिरीश महाजन म्हणाले.
कॅमेऱ्यात सगळे आले आहेत.आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. ठराविक लोकांना सोडून द्यायचं, तुमच्याशी बोलायला लावायचं. शासन विरोधी पोस्टर लावायचे. या घटनेची तीव्रता, गंभीरता याचा विचार करुन इथं कुणी राजकारण करु नये,अशी विनंती असल्याचं गिरीश महाजन म्हणाले.
आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, याची माहिती नाही. मी दुपारपासून इथं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. काही पोलीस जखमी झालेले आहेत, त्यांना बघणार आहे. ही घटना गंभीर आहे, यानंतर पोस्टर बॅनर लावून ज्यांनी उभं केलं त्यांना लाज वाटली पाहिजे, असं गिरीश महाजन म्हणाले. या प्रकरणात राजकारण केलं जात आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
पाहा व्हिडीओ:
संबंधित बातम्या :
Badlapur News : बदलापूर प्रकरणाचा तपास IPS आरती सिंह करणार, राज्य सरकारची SIT स्थापन