Bhiwandi : पतंगाच्या मांजाला अडकलेल्या कावळ्याला वाचवण्यासाठी गेला अन् विजेचा झटका बसला; अग्निशमन दलाच्या जवानाचा जागीच मृत्यू
Fire Brigade Worker Died: या घटनेनंतर अपुऱ्या सुरक्षा सुविधा, संरक्षणात्मक साधनांचा अभाव आणि वरिष्ठांच्या निष्काळजीपणावर कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. दोषींवर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली.

ठाणे : मकरसंक्रांतीच्या दिवशी भिवंडीत एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. भादवड टेमघर परिसरात पतंगाच्या मांजाला अडकलेल्या कावळ्याची सुटका करताना विजेचा झटका बसल्याने अग्निशमन जवानाचा जागीच मृत्यू झाला. नितीन पष्टे (वय 50) असं मृत झालेल्या जवानाचं नाव आहे. तर आसाराम आघाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि अपुऱ्या सोई-सुविधांमुळे आमच्या सहकाऱ्याचा जीव गेला असं सांगत अग्निशमन दलाचे जवान संतप्त झाल्याचं दिसून आलं.
पतंगाच्या मांजाला अडकलेल्या कावळ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान फायबर एक्सटेन्शन पाईपचा वापर करून कावळ्याची सुटका सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानाचा झाडाच्या वरून गेलेल्या उच्चदाब वीजवाहिनीचा संपर्क झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Fire Brigade Worker : अपुऱ्या सुविधांमुळे मृत्यू, कर्मचाऱ्यांत संताप
या घटनेनंतर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अपुऱ्या सुरक्षा सुविधा, संरक्षणात्मक साधनांचा अभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे
एका कर्मचाऱ्याने तक्रार करताना सांगितलं की, "आमच्याकडे 16 गाड्या आहेत, पण फक्त चारच कर्मचारी आहेत. राजेश पवार हे अधिकारी मनमानी करत आहेत, पैसे खात आहेत. आज जी घटना घडली याला राजेश पवार हे जबाबदार आहेत."
दुसरा एक कर्मचारी म्हणाला की, "भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फायर ब्रिगेडमध्ये बदली काम करावं लागतं. वाहन चालकाचं काम करताना रिलिव्ह करण्यासाठी दुसरे कर्मचारी नाहीत. आधी 8 तासांचे काम होते आता ते 12 तासांचे करण्यात आलं. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत, अधिकारी त्या तिथल्या तिथेच दाबून ठेवतात."
जवानांना देण्यात येणाऱ्या कोणत्याही साहित्याचे टेस्टिंग करून दिलं जात नाही. त्यावर आमचा जीव अवलंबून असतो, आमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं एका कर्मचाऱ्याने डोळ्यात पाणी आणत सांगितलं.
ही बातमी वाचा:























