शेतकऱ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी बैलगाडा शर्यती : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
BAILGADA SHARYAT: भिवंडी तालुक्यातील ईताडे गावात भव्य छखड्यांच्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले.
BAILGADA SHARYAT: शेतकऱ्यांचा पारंपरिक असलेला बैलगाडा शर्यतीचा खेळ आठ वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी हा खेळ पुन्हा सुरू करावा म्हणून तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सूचना देऊन सुप्रीम कोर्टात बाजू मांडत बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील इच्छा मोदींनी पूर्ण करण्यासाठी आज हजरोंच्या संख्येनं बैलगाडा शर्यतीची आयोजन करण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रसरमाध्यमांशी बोलताना सांगितले.
छखड्यांच्या जंगी शर्यतींचा थरार
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार (सांसद) क्रीडा महोत्सवा अंतर्गत भिवंडी तालुक्यातील ईताडे गावात भव्य छखड्यांच्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन रविवारी सकाळी 8 ते 5 या कालावधीत करण्यात आले. ईताडे गावचे सरपंच जगन पाटील यांनी कपिल पाटील फाउंडेशनचे देवेश पाटील आणि भाजपा व्यापारी आघाडी ठाणे ग्रा. जिल्हाध्यक्ष यशवंत सोरे यांनी या बैलगाडा शर्यती आयोजित केलं होत. भिवंडीतील जय मोनशेरा प्रसन्न ईताडे या ठिकाणी बैलगाडा शर्यत प्रेमींना छखड्यांच्या जंगी शर्यतींचा थरार अनुभवता आला.
केंद्रीय राज्यमंत्री छखड्यांच्या बैलगाडा घेऊन मैदानात
छखड्यांच्या बैलगाडा शर्यतीमध्ये आज 15 जिल्ह्यातून सुमारे तीन हजारांच्यावर बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला आहे. या शर्यतीमध्ये कोट्यवधींची उलाढाल एकच दिवशी झाल्याचे पाहवयास मिळाले आहे. विशेष म्हणजे छखड्यांच्या बैलगाडा शर्यतीच्या घटनास्थळी येताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे चक्क छखड्यांच्या बैलगाडाची दोरी हातात धरून त्यांनीही बैलगाडा शर्यतीचा आनंद अनुभवल्याने शर्यतीच्या ठिकाणी असलेल्या हजारोंच्या जमावासह ढोल ताश्याच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
बोकडांसह लाखोंची बक्षिसांची लयलूट
तर या शर्यतींमध्ये 1 गोंड्यावरती शर्यत जिंकणाऱ्या बैलजोडी साठी लकी ड्रॉ द्वारे 5 चिठ्ठ्या काढून 1 बाईक, टीव्ही, फ्रीज, कुलर,सायकल आदी बक्षिसे देण्यात आली. तर 2 गोंड्यावरती शर्यत जिकणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ द्वारे 2 चिठ्ठ्या काढून 3 बाईक देण्यात आल्या. तसेच कोणीही दोन गोंड्यावरती तेच दोन बैल ठेवून पहिली हॅट्रिक मारेल त्या जोडीसाठी एक बाईक बक्षीस स्वरूपात देण्यात आली. त्याचप्रमाणे 2 गोंड्यावरती जिंकणाऱ्या सर्व विजेत्यांना एक बोकड बक्षीस म्हणून दिले गेले.
दरम्यान, या छखड्यांच्या बैलगाडा शर्यतींमध्ये कायद्याचे उल्लंघन केले जाणार नाही, याची दक्षता आयोजकांच्या वतीने घेण्यात येणार असून दुपारी 3 नंतर शर्यतींची नाव नोंदणी बंद केली होती. अंतिम निर्णय हा कमिटीचा असणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर उर्वरित शर्यतींचा निर्णय व्हिडीओ बघून देण्यात आला. छखड्यांच्या बैलगाडा शर्यतींचा थरार ईताडे गावात येवून अनुभवावा असे आवाहन स्पर्धेचे मुख्य आयोजक जगन पाटील यांनी केल्याने बैलगाडा शर्यत प्रेमींमधील काही उलडबाज नागरिकांनी गोंधळ घातल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार करून उलडबाज जमावाला पांगवले होते.