(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra CM: महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
Mahayuti CM : महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, राजकीय वर्तुळात वेगळ्याच फॉर्म्युलाची चर्चा. भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का, जोरदार चर्चा
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकी महायुतीने अतिप्रचंड विजय प्राप्त केला असला तरी आता मुख्यमंत्री कोण होणार, यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीने यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करुन लढवली होती. मात्र, आता भाजपला एकहाती 132 जागा मिळाल्याने मुख्यमंत्री आपलाच हवा असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी धरला आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, याविषयीच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस हे सोमवारी एका लग्नसमारंभासाठी दिल्लीत गेले होते. याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होईल, अशी चर्चा होती. परंतु, ही भेट होऊ शकली नाही. देवेंद्र फडणवीस हे काल रात्री उशीरा मुंबईत परतले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, आता हा तिढा सोडवण्यासाठी अमित शाह हेच मुंबईत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह हे मंगळवारीच मुंबईत येऊ शकतात. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप राज्यात राजस्थान पॅटर्न राबवणार की मध्यप्रदेश पॅटर्न याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.
तर दुसरीकडे नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठरवण्याच्या चर्चेची सूत्रे दिल्लीतून हलवली जात आहेत. दरम्यान, शिंदे आणि फडणवीसांसोबत अमित शहा हे आज रात्री चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
भाजपचा मुख्यमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळपासून एकनाथ शिंदे हे सर्व भेटीगाठी रद्द करुन अज्ञातवासात गेले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत याकरिता वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक गावातील महादेवाच्या मंदिरात दुग्ध अभिषेक करून साकडं घालण्यात आले. वाशिम जिल्हा शिवसेना महादेवराव ठाकरे यांनी हे साकडे घातले.
नगर शहर शिवसेनेच्या वतीने ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात आरती करत एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घालण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यासारखा चेहरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा आणि त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळावं अशी प्रार्थना विशाल गणपतीला करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर मतांच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला, जो विश्वास दाखवला तो आम्ही कधीही विसरणार नाही. आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू...चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा