Bageshwar Dham : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बागेश्वर धामचं भिवंडीत होणार मंदिर; आश्रमाचंही भूमीपूजन संपन्न
Bageshwar Dham Balaji Temple: बागेश्वर धाम सरकार यांचं मंदिर आणि आश्रमाचे भूमीपूजन सोमवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते भिवंडी येथे पार पडलं.
Bageshwar Dham Balaji Ashram: अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धाम (Bageshwar Dham) सरकार यांचं मंदिर आणि आश्रमाचे भूमीपूजन सोमवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते भिवंडी येथे पार पडलं. अंजुरदिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे पार पाडलं. यावेळी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, खासदार मनोज तिवारी, मीरा भाईंदरच्या आमदार अनिता जैन यांच्यासह शेकडो भाविक भक्त आणि मान्यवर उपस्थित होते. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं आश्रम आणि बालाजी मंदिर भिवंडीच उभारण्यात आलं आहे.
बागेश्वर धाम बालाजी मंदिर आणि आश्रमाचं भूमीपूजन संपन्न
भिवंडी तालुक्यातील माणकोली दिवे अंजूर येथे चार एकर जागेत मंदिर आणि आश्रमाचं भूमिपूजन करण्यात आलं असून यासाठी उद्योगपती रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम अनेकांचं श्रद्धास्थान आहे. येथे शेकडो नागरिकांचे दु:ख आणि समस्या निवारण होतं असा दावा केला जातो. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा गेल्या आठ वर्षांपासून दिव्य दरबार भरतो. येथे हजारो नागरिकांशी संवाद साधला जातो. दर मंगळवारी आणि शनिवारी लाखो भाविकांकडून बागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी येतात.
6 आणि 7 नोव्हेंबर रोजी बागेश्वर धाम सरकारकडून भिवंडीत दिव्य बालाजी दरबार भरविण्यात आला होता. त्यावेळी उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माईल स्टोन येथे बागेश्वर धामचे मंदिर आणि आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर आता सोमवारी भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या दैवी शक्तीने आपण लोकांची सर्व दु:ख दूर करू शकतो, असा पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा दावा आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबांचा विरोध केला आहे. बागेश्वर धाम अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतंय, असा अंनिसचा आरोप आहे.
आमदार रवि राणा आणि खासदार मनोज तिवारी उपस्थित
भिवंडीत बागेश्वर धाम बालाजी मंदिर आणि आश्रम भूमिपूजन सोहळा बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते अंजुरदिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन येथे पार पडला. यावेळी आमदार रवि राणा आणि खासदार मनोज तिवारी देखील उपस्थित होते. रवि राणा यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, महाविकास आघाडी सरकारने हनुमान चालिसेचा विरोध केला त्यामुळे यांचे सरकार गेलं मुख्यमंत्री पद आणि चिन्हही गेला. आता आम्ही अमरावती येथे 111 फुटाची हनुमान मूर्ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित उभारणार आहोत.