WhatsApp ला पर्याय देण्यासाठी आता Signal चे भारतीय बाजारपेठेवर लक्ष, सह-संस्थापक म्हणाले...
व्हॉट्सअॅपच्या ( whatsapp) नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे यूजर्स आता नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. त्यामुळे सिग्नल (Signal) सारख्या सोशल मीडियाने आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. आता सिग्नलचे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन (Brian Acton ) यांनी तशी कबुलीही दिलीय.
नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठ एवढी मोठी आहे की जर तुम्ही भारतासाठी काही निर्माण करत असाल तर ते जगासाठी निर्माण करत असता असे मत 'सिग्नल'चे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी व्यक्त केलंय. ते एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
सिग्नल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचं सांगत ते म्हणाले की, "भारत एक विविध संस्कृती असणारा देश आहे. त्यामुळे सिग्नल या ठिकाणी हिंदीसह 12 भाषामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माझे भारतीय सहकारी इथल्या बाजारपेठेविषयी मला बरीच उपयुक्त माहिती देतात. त्यामुळे प्रोडक्ट आयडियाचा अंदाज येण्यास मदत मिळते. भारत जगातला असा प्रमुख देश आहे की जर तुम्ही भारतासाठी काही उत्पादन निर्माण करत असाल तर ते तुम्ही जगासाठी निर्माण करत असता."
ब्रायन अॅक्टन म्हणाले की, "भारतात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी यूजर्स आहेत. त्यामुळे भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारतीय लोकांना सिग्नलचे यूजर्स बनवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यूजर्सनी आपल्या डिजिटल प्रायव्हसी सोबत कोणतीही तडजोड करु नये यासाठी आम्ही त्यांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत."
WhatsApp ला टक्कर देण्यासाठी नवीन मॅसेजिंग अॅप, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा 'Signal'
ब्रायन अॅक्टन पुढे म्हणाले की, "आम्ही आमच्या सर्व्हरची क्षमता वाढवत आहोत. आता आमच्या यूजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचे व्यवस्थापन करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. गेल्या काही काळापासून भारतीय लोकांनी सिग्नलवर साईन अप केल्याने आम्ही समाधानी आहोत. भारतीय यूजर्स सिग्नलचा वापर करण्यासाठी उत्सुक आहेत आणि ही आमच्यासाठी एक संधी आहे."
सिग्नलची व्हॉट्सअॅपशी तुलना केली जात आहे. त्यावर बोलताना ब्रायन अॅक्टन म्हणाले की, "आमच्याकडे प्रायव्हसी फिचर्स, डिसअपीयरिंग मेसेज अशा प्रकारच्या सुविधा आहेत. सिग्नलचे सर्व मेसेज एनक्रिप्टेड आहेत, यात मेटाडाटाचा समावेश आहे."सिग्नलचे सह-संस्थापक असलेले ब्रायन अॅक्टन हे व्हॉट्स अॅपचे देखील संस्थापक होते. ब्रायन अॅक्टन आणि जॅन कोम यांनी 2014 साली व्हॉट्स अॅपची मालकी फेसबुकला विकली. त्यानंतर 2017 साली फेसबुकशी काही मतभेद झाल्यानंतर त्यांनी कंपनी सोडायचा निर्णय घेतला.
व्हॉट्स अॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. या नव्या पॉलिसीमुळे यूजर्सना आता आपल्या व्हॉट्स अॅपची माहिती फेसबुक आणि इतर कंपन्यांशी शेअर करायला मान्यता द्यावी लागणार आहे. तसे न केल्यास व्हॉट्स अॅप वापरता येणार नाही असे सांगण्यात येतंय.
व्हॉट्स अॅपच्या या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे यूजर्सनी आता त्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला असून ते सिग्नल आणि टेलिग्राम हे अॅप डाऊनलोड करायला प्राधान्य देत आहेत. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी सिग्नलचे उघड समर्थन केलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात या सोशल मीडियाच्या यूजर्सच्या संख्येत मोठी भर पडल्याचं पहायला मिळतंय.