(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sweat | आता घामानं चार्ज करा स्मार्ट वॉच
स्मार्ट वॉच चार्ज करण्याचं तुमचं टेंशन दूर होण्याची शक्यता आहे. आता शरीरातून येणाऱ्या घामाच्या मदतीनं स्मार्ट वॉच चार्जिंग करता येणार आहे.
सध्याच्या जीवनशैलीत स्मार्ट वॉच म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. काही जण तर 24 तास हातात स्मार्ट वॉच घालून असतात. या स्मार्ट वॉचमुळं तुम्ही किती पावलं चाललात, तुमच्या हृदयाचे ठोके किती पडतायत, तुमची रक्तातील ऑक्सीजनची पातळी किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. 24 तास हातात स्मार्ट वॉच मग ते चार्ज कधी करणार? एखाद्या दिवशी स्मार्ट वॉच चार्ज केलं नाही तर केवढं टेंशन येतं. मात्र, आता तुमचं हे टेंशन दूर होण्याची शक्यता आहे. याच कारण आहे संशोधकांनी लावलेला नवा शोध. आणि हा शोध आहे शरीरातून येणाऱ्या घामाच्या मदतीनं स्मार्ट वॉच चार्जिंग.
हे वाचून तुम्ही म्हणाल काहीही काय? घामानं स्मार्ट वॉच कसं चार्ज होईल, तर होईल. नक्की होईल. याचं कारण संशोधकांनी स्मार्ट वॉचसाठी एक खास बॅटरी तयार केली आहे जी इलेक्ट्रिसिटीच्या ऐवजी घामाने चार्ज होईल. ही एक पोर्टेबल बॅटरी असून स्पेशल वायरलेस डिवाइससाठी तयार करण्यात आलेली आहे. ही बॅटरी फक्त दोन मिलीलीटर घामानं 20 तासांपर्यंत स्मार्ट वॉच चार्ज करू शकणार आहे.
सिंगापुरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल यूनिव्हर्सिटीने ही 0.8 चौरस इंचाची प्लेन बँडेजवाली पोर्टेबल बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी एका स्ट्रेचेबल आणि घाम शोषून घेणाऱ्या कपड्याला अटॅच केलेली आहे. ही बॅटरी मनगटावर घड्याळाप्रमाणे स्मार्टवॉचच्या खाली घालता येते. केवळ स्मार्ट वॉचच नव्हे तर दुसऱ्या गॅझेट्समध्येही ही बॅटरी लावता येते. या उपकरणात शरीरावरचा घाम शोषून घेण्यासोबतच तो स्टोअर करण्याची क्षमताही आहे. याचा एक फायदा असा की, जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो तेव्हा तो या उपकरणात साठवला जातो. त्यामुळे स्मार्ट वॉचची बॅटरी डाऊन झाली असेल आणि तुम्हाला घाम येत नसेल तर साठवून ठेवलेल्या घामामुळे तुमचे स्मार्ट वॉच चार्ज होऊ शकणार आहे आणि स्मार्ट वॉच सतत सुरु राहू शकते.
संशोधकांनी सुरुवातीला या बॅटरीचा प्रयोग आर्टिफीशियल मानवी घामावर केला. तेव्हा ही बॅटरी 3.57 वॅट व्होल्टेज तयार करीत होती तर मानवी घामापासून ही बॅटरी 4.2 वॅट व्होल्टेज तयार करीत असल्याचं आढळून आलं आहे.
नानयांग टेक्नॉलॉजीचे संशोधक आणि रिसर्च हेडचे म्हणणे आहे की, हे नवीन तंत्रज्ञान हातात घालता येणाऱ्या गॅझेट्ससाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होऊ शकणार आहे. त्यांनी हेसुद्धा सांगितले की, वायरलेस गॅझेट्सच्या चार्जिंगसाठी आणखी नवीन उपकरणांचा आम्ही शोध सुरु ठेवला आहे. इलेक्ट्रिसिटीच्या ऐवजी अन्य गोष्टींनी उपकरणं चार्ज करण्यासाठी आम्ही बॅटरी तयार करीत आहोत.