New Year Celebration : खबरदार! न्यू ईयर सेलिब्रेशनमध्ये झिंगाट करत उच्छाद घालणार्यांवर पोलिसांचा वॉच, ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त
न्यू ईयर सेलिब्रेशनमध्ये झिंगाट करत उच्छाद घालणार्यां हुल्लडबाजांवर नागपूर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवरहॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार मालकांवर तसा दंडकच घातला आहे.
New Year Celebration नागपूर : देशासह अवघ्या जगभरात न्यू ईयरच्या सेलिब्रेशनचा उत्साह शिगेला पोहचला आहे. त्यासाठी अनेकांनी प्लॅनिंग देखील केलं असेल. मात्र नागपुरात जर तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट, पब किंवा बार मध्ये जाऊन मद्यपान करून भांडण करणार असाल, धिंगाना करणार असाल, तर सावधान! कारण संबंधित बार, पब आणि रेस्टॉरंटकडून लगेच तुमचे फुटेज पोलिसांना उपलब्ध होऊ शकतात. नागपूर पोलिसांनी हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार मालकांवर तसा दंडकच घातला आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोक जल्लोष करताना हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आणि बार मध्ये मद्यपान करतात तिथेच त्यांचे भांडण होतात आणि त्यामुळे गुन्ह्याच्या आणि अपघाताच्या घटना घडतात. यंदा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात गंभीर गुन्हे घडू नये, अपघातात होऊन कोणाचा ही मृत्यू होऊ नये, यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. नागपूर शहरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल 4 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तात उपस्थित राहतील. कोणी ही कायद्याचे उल्लंघन केल्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
रावणवाडी पर्यटनस्थळ दोन दिवस पर्यटनासाठी बंद
निसर्ग सानिध्यात असलेल्या रावणवाडी येथील पर्यटनस्थळ दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. निसर्गाच्या मुक्त वातावरणाची उधळण करण्यासाठी रावणवाडी इथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, पर्यटकांकडून निसर्ग आणि त्यातील पशुपक्ष्यांना धोका निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वन विभागांनं वर्तवून हे पर्यटनस्थळ 31 डिसेंबर आणि एक जानेवारीला बंद ठेवलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर साजरा करण्याकरिता तरुणाईंकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येतो, यावेळी धुमाकूळ घालणाऱ्या आणि तळीरामांचा वेळीचं बंदोबस्त करता यावा यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील 17 ही पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच्यामुळे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट तुरूंगवास
नववर्षाचे स्वागत करताना मद्यपान करून वाहन चालवू नका. कारण पुणे शहरांतील चौकांमध्ये अशा वाहन चालकांवर पुणे पोलिस विशेष मोहिमेद्वारे कारवाई करणार आहेत. शहर आणि उपनगरांतील प्रमुख चौक, रस्त्यांवर 'ब्रेथ अॅनालायझर'द्वारे वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच नववर्षाचा जल्लोष करताना कसला त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. नववर्षाचे स्वागत करताना अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात तीन हजार 500 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या