(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह वरुणराजा काही वेळासाठी आला अन् काही ठिकाणी थरकाप उडवून गेला, अशी परिस्थिती वादळी वाऱ्यानंतर निर्माण झाली होती.
मुंबई : राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा (Rain) धुमाकूळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, आज वादळी वाऱ्यासह राजधानी मुंबई (Mumbai) पावसाच्या तडाख्यात सापडल्याचं दिसून आलं. काही वेळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या (Accident) घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, घाटकोपर येथील पेट्रोल पंपाववर महाकाय होर्डींग कोसळल्याने तब्बल 70 ते 80 चारचाकी गाड्या या बॅनरखाली अडकल्या आहेत. दुसरीकडे वड्याळ्यातही टॉवर कोसळून काही वाहनं टॉवरखाली अडकली आहेत.
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह वरुणराजा काही वेळासाठी आला अन् काही ठिकाणी थरकाप उडवून गेला, अशी परिस्थिती वादळी वाऱ्यानंतर निर्माण झाली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाला. मुंबई मेट्रो, मध्य रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. तर विमानसेवेची धावपट्टी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
महाकाय बॅनरखाली 70-80 वाहनं अडकली
मुंबईतील घाटकोपर परसरात एक महाकाय बॅनर पडून मोठं नुकसान झालं आहे. पेट्रोल पंपावरच हे बॅनर कोसळल्याने पेट्रोल पंपाचं नुकसान झालं असून बॅनरखाली तब्बल 70 ते 80 वाहनं अडकली आहेत. या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील पेट्रोल पंपाखाली बाईक आणि रिक्षा चालक अडकले होते.गॅस कटरच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. विशेष म्हणजे हे बॅनर हटविण्यासाठी महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच संबंधितास नोटीस बजावली होती, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फोनवरुन बोलताना दिली. या दरम्यान,अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
अनधिकृत 120 फुटाचे बॅनर
मागील वर्षी ऍडव्हर्टायझिंग मीडिया कंपनीवर हे होर्डिंग लावताना वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका 40 बाय 40 स्क्वेअर फुटापर्यंत बॅनर लावण्याची परवानगी देते. मात्र, हे लावण्यात आलेलं होर्डिंग 120 स्क्वेअर फूट आकारचे असल्याचे समजते.
वडाळ्यात टॉवर कोसळला
वादळी वाऱ्याच्या जोरामुळे वडाळा परिसरात टॉवर कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. टॉवरखाली अडकलेल्या 4 ते 5 चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. टॉवर दुर्घनटेनंतर अग्निशमन दलाने लगेचच घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून गाडीतून काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला.
जोगेश्वरीत झाड कोसळलं
सोसाट्याच्या वारा आणि पडलेल्या मुसळधार पावसात जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका शाखेजवळील मोठे माडाचे झाड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे या झाडाखालीच काही लहान मुले खेळत होती. मात्र, सुदैवाने घटना घडण्यापूर्वीच ते तेथून निघाल्याने अनर्थ टळला.
चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप
वादळी वारं आणि मुसळधार पावसामुळे मुंबईतील अतिमहत्वाचा परिसर असलेल्या चर्चगेट परिसराला वाळवंटाचं स्वरुप प्राप्त झालं होतं. येथील ओवल मैदान , हाई कोर्ट , सेशन कोर्ट , मुंबई यूनिव्हर्सिटी राजाबाई टॉवर परिसरही धुळीत अडकला होता.
वाहतूक सेवा काही काळासाठी ठप्प
मुंबईत पडलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर देखील पाहायला मिळाला. मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. तर, मध्य रेल्वेची सेवा काही काळासाठी बंद पडली होती. मुंबई मेट्रोही घाटकोपर मार्गावर ठप्प झाली होती. तर, विमानवाहतूकही वळवण्यात आली होती. आता, वाहतूक सुरू झाली असून सर्वकाही पूर्वपदावर येत आहे.
वीज वाहिनीच्या टॉवरवर भडका, वीजपुरवठा खंडीत
नवी मुंबईतील ऐरोली परिसरात हायटेन्शन वीज वाहिनीच्या टॅावरवर स्पार्कींग होऊ आग लागल्याची घटना घडलीय. वादळी वाऱ्यामुळे येथील टॅावरने पेट घेतला. त्यामुळे, ऐरोली,दिघा परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला होता.
मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील वीजपुरवठाही खंडीत झाला असून कल्याण ,टिटवाळा,डोंबिवली मध्ये ३ तासांपासून वीजपुरवठा बंद आहे.
वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा
मुंबई आणि उपनगरात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्व दूतगती महामार्गावर घाटकोपरमधून मुलुंडच्या दिशेने जाणारा मार्गावर ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घाटकोपर रमाबाई नगर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
35 नागरिकांना रुग्णालयात हलवले
मुंबई महानगरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अचानक कोसळलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच आवश्यक उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित आहेत. घाटकोपर येथील छेडानगर परिसरात कोसळलेल्या होर्डिंगच्या घटनास्थळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. श्रीमती अश्विनी जोशी या स्वतः उपस्थित राहून महानगरपालिका आणि इतर बचाव यंत्रणांना निर्देश देत आहेत. या ठिकाणाहून आतापर्यंत 35 पेक्षा अधिक नागरिकांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी 20 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) यांना देखील पाचारण करण्यात आले असून पुढील बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा