(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vitthal Mandir Pandharpur : विठ्ठल भक्तांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला, आजपासून देवाचे 24 तास दर्शन व्यवस्था
Vitthal Mandir Pandharpur : आजपासून देवाचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंदिरात 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे.
पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Ekadashi) येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंदिरात (Pandharpur Mandir) 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार असल्याने रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे.
आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास देवाच्या पोशाख आणि शेजारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात येणार आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे.
कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी होत असून या यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना यामुळे दिवसरात्र दर्शन घेता येणार आहे. कार्तिकी यात्रा संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी विठूरायाची प्रत्यक्ष पूजा होणार असून या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होतील.
शिणवटा जाणवू नये यासाठी देवांसाठी मऊ कापसाचा लोड
24 तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजता मंदिर बंद होत असते . आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा , दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच कारणांसाठी दर्शन बंद राहणार असून उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. सर्वसाधारणपणे यात्राकाळात म्हणजे मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. यामुळे यात्रा काळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे देवाच्या पायावर दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे .
जिल्हाधिकाऱ्यांनी केली कार्तिकी यात्रा तयारीची पाहणी
कार्तिकी एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही दिवसांपूर्वी तयारीचा आढावा घेतला. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा 65 एकर भक्ती सागर याची पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही वयाची सूचना प्रशासनाला दिल्या. ज्या ठिकाणी दर्शन रांगेजवळ मठ असल्याने तेथून वारकरी जी घुसखोरी करतात त्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय दर्शन रांगेत दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने येथेही हजारो भाविक घुसखोरी करीत असल्याने हे अंतर कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.