![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बापू... इथेही झाडी हाय, डोंगार हाय, पण रस्ता मात्र ओके नाय; तिपेहळ्ळी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा
Solapur News : सांगोला तालुक्यातील तिपेहळ्ळी गावाने शहाजीबापू पाटील यांना इथेही झाडी हाय, डोंगार हाय, पण रस्ता नसल्याने काहीच ओके नसल्याचे सांगितलं आहे. रस्ता झाला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे.
![बापू... इथेही झाडी हाय, डोंगार हाय, पण रस्ता मात्र ओके नाय; तिपेहळ्ळी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा Tipehalli villagers warned Shahajibapu Patil to boycott the elections due to the poor condition of road बापू... इथेही झाडी हाय, डोंगार हाय, पण रस्ता मात्र ओके नाय; तिपेहळ्ळी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/78ba76ee65d19aad296130e1d7c0ad91166986841212083_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Solapur News : पूर्वी सोलापुरातील सांगोला (Sangola) तालुका हा भाई गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या नावाने ओळखला जायचा. आता 'काय झाडी काय डोंगार' यामुळे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या नावाने सांगोला ओळखला जाऊ लागला आहे. पण याच सांगोला तालुक्यातील एका गावाने बापूंना इथेही झाडी हाय, डोंगार हाय, पण रस्ता नसल्याने काहीच ओके नसल्याचे सांगितलं आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटी (Guwahati) इथे केलेल्या या वक्तव्यावर त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. पण आता त्यांच्याच मतदारसंघातील मतदार त्यांचाच डायलॉग त्यांनाच ऐकवून रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधू लागले आहेत. रस्ता झाला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार (Boycott Election) घालू असा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे.
रस्ता नसल्याने गावात ना एसटी, ना शाळा, ना दवाखाना
सांगोला तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे तिपेहळ्ळी हे गाव सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. गुवाहाटीसारखी नसली तरी इथेही तसेच सृष्टीसौंदर्य पाहायला मिळते. डोंगराच्या रांगा आणि हिरवळीने नटलेल्या या निसर्गरम्य गावात यायच्या रस्त्याला मात्र गेल्या 50 वर्षात मुहूर्त न मिळाल्याने वैतागलेल्या या ग्रामस्थांनी आता आश्वासने बास रस्ता नाही मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. प्रत्येक निवडणुकीत आजवर केवळ आश्वासने मिळाली मात्र रस्त्यावर कधी डांबर न पडल्याने गावात ना एसटी येते, ना शाळा आहे, ना दवाखाना. अशा स्थितीत शहाजीबापू तुमच्या मतदारसंघातील आमच्या गावात देखील डोंगार हाय, झाडी हाय पण रस्ता नसल्याने काहीच ओके नाही, असे गावातील तरुण बोलू लागले आहेत. बापू आता तुम्हाला इकडे लक्ष द्यावेच लागेल अशी आग्रहाची मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत.
रस्ता झाला तर मतदान, नाहीतर गावातून मतपेट्या रिकाम्या जातील, ग्रामस्थांचा इशारा
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या जवळ असणाऱ्या या गावातील हा रस्ता 40 वर्षांपूर्वी दुष्काळी जनतेला काम देण्यासाठी केला होता. आता या रस्त्याची अवस्था अतिशय भयानक झाली असून गावातील ओढ्याचे पाण्यातून ग्रामस्थांना वाट काढत जावे लागते. गावातील अनेकांचे इथे प्रघात झाल्याने दवाखान्याला देखील दुसऱ्या गावात जावे लागत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. आता शहाजीबापू यांनी मनावर घेऊन हा रस्ता केला तर यंदा मतदान नाहीतर गावातून मतपेट्या रिकाम्या जातील, असा इशारा द्यायलाही ग्रामस्थ विसरलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)