Tanaji Sawant: आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना पक्षातील शिवसैनिकाकडून घरचा आहेर; शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत म्हणत केला हल्लाबोल
Tanaji Sawant: सोलापुरच्या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. सोलापूरचे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी आरोग्यमंत्र्यांना पक्षातील शिवसैनिकानेच घरचा आहेर दिला आहे.
सोलापूर: मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे चांगलेच चर्चेत आले आहेत. आधी त्यांच्या पुतण्याने शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच सोलापुरच्या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. सोलापूरचे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी आरोग्यमंत्र्यांना पक्षातील शिवसैनिकानेच घरचा आहेर दिला आहे.
आरोग्य मंत्र्यांच्या पुतण्याने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेट घेतल्याने शिवसेना जिल्हा प्रमुखाने तानाजी सावंत यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी उठाव केला. मात्र नुकतच, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे शरद पवारांना (Sharad Pawar) भेटले. आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवलं आहे असा संदेश घेऊन त्यांनी ही भेट घेतली. अशा गोष्टी शिवसैनिक सहन करणार नाही, या संदर्भातली माहिती आमच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दिली आहे, असंही मनीष काळजे त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत असताना एका पुतण्याला पाठवून पक्षाला अल्टीमेटम देणं आणि पक्षावर आपला मालकी हक्क आहे असं दाखवणे बंद केलं पाहिजे. शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणाला आरोग्यमंत्री केलं आहे. मात्र, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच अल्टीमेटम देणार असाल तर याचे परिणाम भोगावे लागतील. तुमचा एक पुतण्या शरद पवारांना (Sharad Pawar) भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की,आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू,असं म्हणत मनीष काळजे यांनी हल्लाबोल केला आहे.
मागील इतिहास पहिला तर 2019 ला आमदारकीच्या वेळेस काय झालं, करमळ्यात काय झालं..? ज्या पक्षात आपण राहता त्या पक्षालाच आपण संपावण्याचा किंवा आपल्याच पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने पडतील असा प्रयत्न जर होत असेल तर आम्ही शिवसैनिक हा प्रकार सहन करणार नाही. याबाबत जिल्ह्यातील चार जिल्हाप्रमुख मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आरोग्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यामुळे पक्षातील खरे आणि निष्ठावंत शिवसैनिक दुखावले जाणार आहेत. एकीकडे पुतण्या आणि एकाकडे भावाच्या माध्यमातून पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी थांबवावा, हे योग्य नाहीये असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी धाडला भेटीचा निरोप
राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याबाबतची वक्तव्य केली या सर्व घडामोडी घडत असतानाच आता तानाजी सावंत (Tanaji sawant) यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे.
तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) भेटीसाठी बोलावलं असून तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत बोलावल्याची माहिती समोर आली आहे. भेटीसाठी बोलावलेल्या तानाजी सावंताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कान टोचवणार का? अशी चर्चा आता समोर आली आहे. तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीतून बाहेर पडण्याबाबत अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी वक्तव्ये केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या भेटीत केलेल्या वक्तव्याबाबत शिंदे सावंतांचे (Tanaji sawant) कान टोचणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.