Solapur News: प्रलंबित प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई पायी वारी; सोलापूरचे अर्जुन रामगिर मुख्यमंत्र्याच्या भेटीला
Maharashtra Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई पायी चालत आलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली भेट.
Maharashtra Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीनं सुटावेत या मागणीसाठी 72 वर्षीय अर्जुन रामगिर यांनी आत्मक्लेश यात्रेची सुरुवात केली. यासाठी त्यांनी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत प्रवास केला. अखेर अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच, शक्य तेवढे सर्व नागरी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांना दिलं.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. शहरातील विमानतळ फनेलच्या आड येणाऱ्या चिमणीचा विषय असेल, उजनी धरणाच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेची रखडपट्टी असेल किंवा मग उद्योग धंद्यांचा अभाव असेल, शहराला पाच दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा असेल असे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या सर्व कारणांमुळे सोलापूर जिल्हयातून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले असून वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. तसेच या प्रश्नांकडे सर्वच राजकीय नेते आणि पक्षाकडून दुर्लक्ष झाले असल्याने अखेर हे प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढण्याचा संकल्प अर्जुन रामगिर यांनी केला. त्यानुसार त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी थेट पायी मुंबईकडे चालत जाण्याचा निर्धार केला.
रामगिर पनवेलपर्यंत चालत आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्याच वेळी ते मुंबईकडे चालत येत असल्याची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत पनवेलमधील शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी नगरसेवक अॅड. प्रथमेश सोमण यांना त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रामगिर यांची विचारपूस केली. त्यांच्यावर प्रथमोपचार करून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, त्यांचा वर्षा बंगल्यावर पाहुणचार करण्यात आला. त्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांची भेट घेतली आणि त्यांनी रामगिर यांच्या सगळ्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच, सर्व मागण्या लेखी देण्यासही सांगितल्या. तसेच, सोलापूर शहरातील चिमणीचा प्रश्न मला माहित असून तो लवकरच सोडवू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. सोलापूर जिल्ह्यातील इतरही विकासकामांना प्राथमिकता देऊन त्यातील जी कामं तातडीनं सोडवता येथील ती नक्की सोडवू, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी रामगिर यांना दिलं.
सोलापूर शहरातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा रामगिर यांचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. तसेच अशा सर्वसामान्य लोकांसाठी माझ्या वर्षा बंगल्याचे दरवाजे सदैव उघडे असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी समाधानाने पुन्हा सोलापूर जाण्याचा निर्णय घेतला.