धक्कादायक! मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी चक्क खाजगी व्यक्तींची नियुक्ती; ऑडिओ क्लिप व्हायरल
Maratha Reservation Survey : सोलापूर महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने आपल्याजागी चक्क खाजगी व्यक्तींची नियुक्ती करून सर्वेक्षण करून घेत असल्याचे समोर आले आहे.
Maratha Reservation Survey : सोलापुरात (Solapur) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सर्वेक्षणादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने आपल्याजागी चक्क खाजगी व्यक्तींची नियुक्ती करून सर्वेक्षण करून घेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाचा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या संबंधीत कर्मचारी याने देखील आपल्याजागी खाजगी व्यक्तींना सर्वेक्षणासाठी पाठवल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता हे सर्वेक्षण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
काही दिवसांपूर्वी अहमदनगर महानगरपालिका हद्दीत मराठा आरक्षणाबाबत करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणासाठी चक्क पहिली पास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. आता असाच काही प्रताप सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत देखील पाहायला मिळत आहे. महापालिका कर्मचारी असलेल्या अनिल खरटमल यांची सर्वेक्षणासाठी स्वतःची नेमणूक असताना खासगी दोन लोकांना सर्व्हे करण्यासाठी नेमल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबत अनिल खरटमल यांनी स्वतः कबुली देत आपली तब्येत खराब असल्याने खाजगी व्यक्तींना पाठवल्याचे सांगितले. दरम्यान, याविरोधात अंनत जाधव यांनी महापालिका आयुक्ताकडे तक्रार करत कारवाईची मागणी केलीय. तर, हा प्रकार समोर आल्यावर मराठा समाजबांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पहिल्या दिवसापासूनच सर्वेक्षण चर्चेत...
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे राज्यभरात 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे घर निहाय सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी वेगवेगळ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या दिवसापासूनच हा सर्वे चर्चेत आला आहे. पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी सर्वे करतांना तांत्रिक अडचणी आल्याने सर्वे बंद पडला होता. त्यानंतर अहमदनगर शहरात चक्क चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला. अशात अनेक कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, काहींना इंग्रजी, मराठी लिहिता, वाचता येत नसल्याचे समोर आले. आता तर सोलापुरात थेट सर्वेक्षणासाठी खाजगी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या सर्वेक्षणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे आज याबाबत मागासवर्ग आयोगाची बैठक देखील होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
सावळा गोंधळ! पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचा सर्वेक्षण; मराठा समाजात तीव्र संताप