Success Stroy : शाब्बास पठ्ठ्या! इंजिनिअरिंगची नोकरी सोडून शेतात रमला, स्ट्रॉबेरीच्या शेतीतून करतोय लाखोंची कमाई....
मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या चेतन निंबाळकर लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडून गावी येऊन करमाळ्यात स्ट्रॉबेरीची शेती केली.
सोलापूर : गरज माणसाला शिकवते म्हणतात पण याला जोड लागते कल्पकता आणि जिद्दीची . करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील तेवीस वर्षीय तरूणाने लॉकडाऊन मध्ये नोकरी सुटल्यावर गावाकडे येऊन स्ट्रॉबेरी (Strawberry) लागवडीचा यशस्वी प्रयोग करून यशाचा नवीन मार्ग शोधला . आपण पिकविलेल्या स्ट्रॉबेरीचे मार्केटिंग देखील चेतन स्वतःच करीत असल्याने घामाला योग्य दाम मिळविण्यात देखील त्याला यश मिळत आहे . सातारा (Satara) , महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील थंड हवामानात येणाऱ्या स्ट्रॉबेरीचा प्रयोग करमाळ्यात करताना सगळ्यांनी चेतनला भीती घातली होती . पण मॅकेनिकल इंजिनियर असलेल्या चेतनकडे असलेली जिद्द , कल्पकता आणि स्वतः वरील विश्वास यातून त्याने स्ट्रॉबेरीचा प्रयोग कमालीचा यशस्वी केला आहे .
खरंतर नोकरी सुटल्यावर अनेक प्रश्न समोर उभे ठाकतात. त्यातच कोरोना काळात ही स्थिती फार भयानक होती. त्यातच चेतनची नोकरी गेल्याने त्याच्यासमोरही अनेक प्रश्न उभे राहिले होते. पण या परिस्थितीही न डगमगता त्याने करमाळ्या सारख्या जिल्ह्यात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला. चेतनला त्याच्या या प्रवासात अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण त्यावर मात करत चेतनने आज एक नवं उदाहरण समोर घालून दिलं आहे.
अशी सुरु झाली स्ट्रॉबेरीची शेती
चेतन कंपनीत कामाला असताना चेतन त्याच्या सहकाऱ्यांसोबत महाबळेश्वरला गेला होता. त्यावेळी तिथे त्याने स्ट्रॉबेरीची शेती पाहिल्यावर त्याबाबत सर्व माहिती घेतली होती. त्यानंतर त्याने महाबळेश्वर येथील नर्सरी मधून सहा हजार रोपे आणलीत आपल्या अर्धा एकर शेतावर 22 सप्टेंबर रोजी लागवड केली. त्याने त्याला योग्य प्रकारे खतपाणी देखील केलं. त्यातून उत्तम असं पीक देखील घेतलं. साठ दिवसानंतर या स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले असून आतापर्यंत निघालेल्या स्ट्रॉबेरीचे व्यवस्थित ग्रेडिंग पॅकेजिंग करून काही माल पुणे बाजारपेठेत पाठवला. तसेच उर्वरित मालाचे व्यवस्थित पॅकिंग करून , करमाळा, माढा, बार्शी, कर्जत, इंदापूर, परांडा अशा परिसरातील स्थानिक किरकोळ फळ विक्रेत्यांकडे स्वतः जाऊन माल देण्यास सुरुवात केली .
स्ट्रॉबेरीला चांगला दर
करमाळ्यातील शेटफळमध्ये 23 वर्षीय चेतन बाबुराव निंबाळकर या तरुणाने आपल्या अर्धा एकर शेतता स्ट्रॉबेरी पिकवली. त्याने त्या स्ट्रॉबेरीचे मार्केटिंग पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये केलं. आज त्याच्या स्ट्रॉबेरीला चढ्या दराने मागणी सुरु झालीये. मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर चेतनला महेंद्रा कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली होती. परंतु त्याला नोकरी मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्येच लॉकडाऊन लागला. त्यामुळे पुन्हा त्याला गावाकडे यावे लागले.
चेतनच्या लालचुटुक स्ट्रॉबेरीला असलेल्या गोडीमुळे त्याला चारशे किलोपर्यंतचा दर मिळाला आहे. त्याच्या अर्धा एकर स्ट्रॉबेरीतून चेतन याला तीन ते चार टन उत्पादन अपेक्षित आहे. कारण त्यामधून त्याला सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे.
हेही वाचा :
33 वर्षाच्या तरुणाचा पराक्रम! 3 वर्षे शेती करुन उभारली 1200 कोटींची कंपनी; जाणून घ्या सविस्तर माहिती