(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bachchu Kadu : गणपती मंडळापुढे चक्क भीकपेटी, जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार, जंगली रमीची जाहिरात केल्यानंतर बच्चू कडूंचे पाऊल
Sachin Tendulkar: प्रहार पक्षाच्या विचारांच्या गणेश मंडळापुढे अशाच प्रकारची भीक पेटी ठेवण्यात आली असून त्यातून जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवण्यात येणार असल्याचं आमदार बच्चू कडून यांनी सांगितलं.
सोलापूर: सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने जंगली रमीची (Junglee Rummy Advertise) जाहिरात केल्याच्या विरोधात सोलापुरातील (Solapur) अकोलेकाटी गावातील गणपती मंडळपुढे चक्क भीकपेटी ठेवण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे (Prahar Party) अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी या मंडळाला भेट देत गणरायाची पूजा केली. त्यानंतर या पेटीत स्वतः 100 रुपये टाकत सचिन तेंडुलकरवर टीका केली. महाराष्ट्रातील प्रहार संघटनेच्या विचारांचे जितके गणेश मंडळ आहेत तिथे अशा भीक पेटी ठेवल्या जातील. यात जमा होणारे पैसे विसर्जन झाल्यानंतर तेंडुलकर यांच्या घरी पोहचवू अशा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला.
दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावात मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत गणपती मंडळाची स्थापना केली आहे. सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या यार मंडळातील गणरायाची पूजा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडली. राज्यात एकीकडे दंगलीचे वातावरण झाले, मात्र अशात अकोलेकाटी या गावातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन गणपती मंडळाची स्थापना केली हे अतिशय धाडसाचे आणि कौतुकाचे काम आहे, मी या कार्याला सलाम करतो अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिली.
दरम्यान आमच्या गावाची लोकसंख्या ही पाच हजार आहे. मात्र आम्ही सर्व गुण्या गोविंदाने राहत आलोय. यंदा पहिल्यांदाच आम्ही गणेशोत्सव मुस्लिम युवा गणेश मंडळाच्या माध्यमातून करतोय याचा आम्हाला आनंद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सचिन तेंडुलकरच्या जंगली रमीच्या जाहिरातीला बच्चू कडूंचा विरोध
सचिन तेंडुलकर यांने जंगली रमी या ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी त्याला विरोध केला आहे. त्याविरोधात त्यांनी सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलनही केलं होतं. ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. कित्येक उदाहरणं आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या झाल्यात, हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतरत्न असूनही अशा गोष्टीची जाहीरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया या आधी बच्चू कडू यांनी दिली होती. आम्हाला क्रिकेटपटू म्हणून त्यांचा अभिमान आहे, पण भारतरत्न म्हणून जर ते अशा जाहीराती करत असतील तर ते मात्र मान्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.
ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींना बळी पडू नका; बच्चू कडू यांचं तरुणांना आवाहन
ऑनलाईन गेमिंगच्या जाहीराती कोणीही करु, पण आपण अशा जाहीरातींपासून लांब राहिलं पाहिजे. गरीब, मध्यमवर्गीय समाजच या गेमिंगमुळे होरपळून निघाला आहे. बऱ्याच राज्यांमध्ये अशा गेमिंगना बंदी घालण्यात आली आहे. अशातच आपल्या राज्यातही अशा गेमिंगवर बंदी घालावी अशी विनंतीही आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. तसेच, तरुणांनाही आमचं आवाहन आहे, ऑनलाईन गेमिंगपासून दूर राहा, अशा जाहीरातींना बळी पडू नका", असं आवाहनही बच्चू कडू यांनी केलं आहे.
ही बातमी वाचा: