सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Solapur Airport : गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांची मागणी असलेल्या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र महायुतीच्याच आमदारांची या कार्यक्रमाला दांडी मारली.
सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांची मागणी असलेल्या सोलापूर विमानतळाचे (Solapur Airport) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी दांडी मारली. जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आमदार, 1 विधानपरिषद सदस्य, दोन खासदार आहेत. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील या दोन महाविकास आघाडीच्या खासदारांसह महायुतीच्या बहुतांश आमदारांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
सोलापूर विमानतळाचे उदघाट्न कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने असले तरी प्रशासनाने सोलापूर विमानतळावर या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना देखील देण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार सुभाष देशमुख आणि माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य वगळता एक ही आमदार, खासदार हजर राहिले नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आपण सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. तर आपल्याला निमंत्रण होते त्यामुळेच आपण आलोय, इतरांबद्दल कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. जायसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी दिली आहे.
दांडी मारलेले आमदार
- सचिन कल्याणशेट्टी (भाजप, अक्कलकोट आमदार)
- विजयकुमार देशमुख (भाजप, उत्तर सोलापूर)
- राजेंद्र राऊत (भाजप पुरस्कृत, बार्शीचे आमदार)
- समाधान आवताडे (भाजप, पंढरपूरचे आमदार)
- राम सातपुते (भाजप, माळशिरस आमदार)
- शहाजीबापू पाटील (शिवसेना शिंदे गट, सांगोला आमदार)
- यशवंत माने (राष्ट्रवादी अजित पवार गट, मोहोळ आमदार )
- बबनराव शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट, माढा आमदार )
- संजय शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट पृरस्कृत अपक्ष - करमाळा आमदार )
- प्रणिती शिंदे ( काँग्रेस आमदार होत्या आता खासदार झाल्यात.)
- धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट - खासदार, माढा लोकसभा)
'या' नेत्यांची उपस्थिती
- सुभाष देशमुख (भाजप, आमदार दक्षिण सोलापूर)
- जयसिद्धेश्वर महास्वामी (माजी खासदार)
लवकरच विमानसेवा सुरू होणार
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात 2016 साली सोलापूर विमानतळाचे नाव उडान योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र जवळ असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचा अहवाल दिल्याने DGCA ने परवानगी नाकारली होती. अनेक वर्ष हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. मात्र मागील वर्षी चिमणी पाडून विमानसेवेचा अडथळा दूर करण्यात आला. मागील वर्षी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाने विविध अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर अखेर प्रवासी विमानसेवेचा परवाना देखील मिळाला आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर सोलापुरातून विमानसेवा करण्यासाठी विविध कंपनीशी शासन आणि प्रशासनाच्या चर्चा सुरु असून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. यात प्रामुख्याने सोलापूर-मुंबई, सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी वाचा