Solapar Rain : पावसामुळे बळीराजा सुखावला! नद्या-बंधारे तुडुंब भरले; जून महिन्याच्या आठवडाभरातच पावसाने सरासरी ओलांडली
Solapar Rain News : तुफान बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बंधारांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे.
सोलापूर : एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला (Farmer) आठवडाभरात झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात आठवडाभर सर्व दूर पाऊस (Rain) पाहायला मिळतोय. तुफान बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बंधारांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर जमिनीत पावसाला पुन्हा सुरुवात होताच खरीप पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे.
रेल्वे बोगद्याखाली 10 फूट पाणी, ग्रामस्थांना रूळ ओलांडून करावा लागतो प्रवास
सोलापुरात मागील सहा दिवसापासून तुफान पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ ते बिटले रेल्वेच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जवळपास आठ ते दहा फूट पाणी साचल्याने हा बोगदा सध्या बंद अवस्थेत पडला आहे. मलिकपेठ येथील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग शहरात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना रेल्वेच्या रुळ ओलांडून जावे लागत आहे. या बोगद्यामधून पाण्याचा निचरा कायमस्वरूपी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्थित यंत्रणा केली नाही असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
जून महिन्याच्या आठवडाभरातच पावसाने सरासरी ओलांडली
सोलापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळं जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद या आठवड्याभरात झाली आहे. सोलापुरात अनेक वर्षानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात एकूण 102 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना कालपर्यंत 103 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. पुढील काही दिवस देखील हे पाऊस असेच असण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापुरात बदललेल्या वातावरणामुळे बळीराजा सुखावला आहे.
आठवड्याभरापासून सलग पाऊस, भाजीपाल्यांचे दर कडाडले
मागील आठवडाभरापासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे एकीकडे दिलासा मिळाला असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे दर कडाडलेले पाहायला मिळत आहेत. पावसामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे बाजारात कच्चा भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, भेंडी, गवार आदींचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो 20 ते 30 रुपये प्रति किलो तर किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो पन्नास रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांची कोथिंबीर ही जागीच खराब झाल्याने कोथिंबीर प्रतिपेंडी चाळीस रुपयांवर पोहोचली आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये शेपू, मेथी 25 ते 30 रुपयांना पोहोचली आहे.