(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला किती जागा जिंकणार? जयंत पाटलांनी आकडा सांगितला!
सध्या महायुतीत असणारे भाजप, अजितदादा आणि शिवसेना यांच्याकडील 12 ते 15 जणांनी राष्ट्रवादीत (NCP) येण्याचा शब्द दिला असून लोकसभेनंतर ही सर्व मंडळी शरद पवार गटात येतील, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.
Jayant Patil : या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मोहिते पाटील आणि जानकर यांच्या निर्णयाचा राज्यभर परिणाम दिसत आहे. 10 पैकी 7 जागा शरद पवार गटाने जिंकल्या आहेत, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. सध्या महायुतीत असणारे भाजप, अजितदादा आणि शिवसेना यांच्याकडील 12 ते 15 जणांनी राष्ट्रवादीत (NCP) येण्याचा शब्द दिला असून लोकसभेनंतर ही सर्व मंडळी शरद पवार गटात येतील, असा दावाही जयंत पाटील यांनी केला. हे नेमके कोण आहेत याचा तपशील सांगून मी त्यांना अडचणीत आणणार नाही? थोडे दिवस जाऊ दे असे सांगत दिल्लीत सत्तांतर होणार आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला.
सांगली वादावरून हात झटकले
सांगली लोकसभा (Sangli Loksabha) वादावर अंग झटकत या जागेची चर्चा ही शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात असून यात राष्ट्रवादीचा कोणताही रोल नाही असे जयंत पाटील म्हणाले. आपण राष्ट्रवादीच्या 10 जागांवर प्रचारात लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार आणि अमित शाह यांची एका बड्या उद्योगपतीच्या घरी बैठक झाल्याच्या चर्चेबाबत विचारले असता यांच्याबाबत गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न सुरु असून ते अंगाला तेल लावलेले पैलवान आहेत , कोणाच्या हाताला लागत नाहीत असा टोला भाजपला लगावला.
उत्तम जानकरांना आमदार करणार
माढा लोकसभेसाठी (Madha Loksabha) धैर्यशील मोहिते पाटील उभे असून उत्तम जानकर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर लढण्यास इच्छुक असून त्यांना आम्ही येथून आमदार करणार असा शब्दही जयंत पाटील यांनी दिला. धनगर आरक्षण प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या नाकालावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. ही धक्कादायक बातमी असून महाराष्ट्र सरकार यात दोषी आहे. त्यांना सर्वोच्य न्यायालयात आरक्षण टिकवता आले नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते व जानकर एकत्र आल्याने माढ्याचा निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असे सांगितले. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होणार याबाबत बोलताना मला यातले काही माहित नाही, फक्त असे करणे योग्य नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
आशिष शेलार यांनी काल बोलताना गडबडीत सुनेत्रा पवार पराभूत होतील असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना ही स्लिप ऑफ टंग नाही तर शेलार यांची तशी अंतर्गत माहित असेल, त्यामुळे ते चुकून बोलले नसतील असा टोला लगावला. अजितदादा तिकडे गेलेत, त्यामुळे त्यांचे तिथे कोणकोण हितशत्रू आहेत याचा अनुभव त्यांना आता येत असेल असा टोला अजित पवार यांना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या