(Source: Poll of Polls)
Sanjay Raut : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल; संजय राऊतांचा दावा
पंतप्रधानपदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये? असा सवालही राऊत यांनी केला. आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो. मात्र, अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असेही संजय राऊत म्हणाले.
सांगली : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? असा सवाल करत उध्दव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले. राऊत यांनी सांगलीमध्ये बोलताना शरद पवार यांचाही पाठिंबा मिळेल, असा दावा केला. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदाचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधानपदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली, तर शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व नेते पाठिंबा देतील. पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो. मात्र, अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असेही संजय राऊत म्हणाले.
विश्वजित कदम तब्येत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत
दरम्यान, चंद्रहार पाटील यांचा अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. विश्वजित कदम तब्येत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, पण पुढील सभेला विश्वजित कदम दिसतील. ते पुढे म्हणाले की, विशाल पाटील हे समजुतदार आहेत, वसंतदादा पाटील यांच्या क्रांतिकारक कुटुंबातील आहेत. विशाल पाटील आपल्या क्रांतीकारक आजोबांच्या विचारांपेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत.
विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत
राऊत यांनी सांगितले की,विशाल पाटील यांच्याशी आमचा यावेळेला उत्तम संवाद आहे. वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत,ते आमच्या कुटुंबातील आहेत. उद्धव ठाकरे यांचे विशाल पाटील यांच्यावर प्रेम असूनही त्यांचेही असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मिलिंद देवरा यांनी केलेल्या टिकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मिलिंद देवरा हे संविधान संपवणाऱ्या करणाऱ्या पक्षात आहेत हे लक्षात ठेवा, अशी टीका केली. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस काय आहे माहीत असल्याचे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नसल्याचे म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या