Pandharpur News : पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या पूजाविधीचं बुकिंग होणार; 1 ऑक्टोबरपासून नवी सिस्टीम
Pandharpur Vitthal Temple News : देवाच्या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
Pandharpur Vitthal Temple News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा अशा सर्व पूजाचे बुकिंग आता घरबसल्या भाविकांना करता येणार आहे. त्यामुळे भाविकांना आता पंढरपूर (Pandharpur) मंदिरात येण्याची आवश्यकता असणार नाही असं मंदिर समितीकडून सांगण्यात आलं आहे. समितीकडून ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.
आता घरबसल्या देवाच्या पूजा करता येणार - मंदिर समितीचा मोठा निर्णय
विठ्ठल मंदिरात देवाच्या विविध पूजांना खूप मोठी मागणी असते. या पूजा मिळवण्यासाठी भाविकांना खूप प्रयत्न करावे लागतात. मात्र, या पूजा बुकिंगमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत असल्याने गरजू भाविकांना इच्छा असूनही या पूजा करता येत नव्हत्या. देवाच्या पूजेतील सुसूत्रता आणण्यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम हाती घेतले होते आता हे काम पूर्ण झाल्याने देवाच्या कोणत्याही पूजा भाविकांना घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करता येऊ शकणार आहेत. यामुळे या पूजेतील कथित गैरव्यवहाराला पूर्णपणे आळा बसणार आहे.
लवकरच ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू
देवाच्या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, भाविकांना पूजेची नोंदणी https:www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. तरी राज्यभरातील भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पूजांचे 1 ऑक्टोबरपासून भाविकांना बुकिंग करता येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समतीच्या वतीने याबाबतची संगणक प्रणाली विकसित झाली असून, याबाबत चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत काम पूर्ण होऊन 1 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पूजा नोंद करता येईल असे मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :