Pandharpur Rain : मोठी बातमी : पंढरपुरातील मंदिरात अडकलेल्या तीन महाराजांची अखेर सुटका, आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुखरूप काढलं बाहेर
Pandharpur Rain : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरामध्ये तीन महाराज अडकल्याची घटना घडली आहे.

Pandharpur Rain : पंढरपूर तालुक्यात (Pandharpur News) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याने भीमा नदीची (Bhima River) पातळी कमालीची वाढली आहे. त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात (Mahadev Mandir) तीन महाराज अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाने या महाराजांना बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे.
सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत. आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला.
आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य
त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत. मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोहोचले नाही, मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली होती. आता तीन साधू आणि येथे असलेले कुत्र्याचे छोटे पिल्लू अशा चौघांना आपत्कालीन यंत्रणेने बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे.
अकलूजमध्ये नीरा नदीचे उग्र रूप
दरम्यान, अकलूजमध्ये ऐन मे महिन्यात नीरा नदीचे उग्र रूप पाहायला मिळत आहे. मे महिन्यात कायम कोरडी पडणारी नीरा नदी आज दुथडी भरून वाहू लागलेली आहे . आज सकाळी अकलूज येथील अकलाई मंदिरात पाणी शिरले आहे. नीरा नदीच्या काठावर असणाऱ्या या अकलाई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. आज अमावस्येच्या निमित्त दर्शनाला आलेल्या अकलूजकरांनी नीरेचे हे रौद्ररूप पाहण्यासाठी गर्दी केली आहे. ज्या मे महिन्यात पक्ष्यांनाही प्यायला पाणी नसते, तिथे असले उग्ररूप कधीच पाहायला मिळाले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
माळशिरस तालुक्यालाही पावसाचा फटका
माळशिरस तालुक्यालाही पावसाचा फटका बसला असून गेल्या दहा दिवसात 256 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतांश बंधारे हे पाण्याखाली बुडून गेलेले आहेत. तालुक्यातील ओढे, नाले ओव्हर फ्लो होऊन वाहत असून दहिगाव येथील पुलावर जवळपास चार ते पाच फूट पाणी आज सकाळी होती. आता पाणी ओसरल्याने येथील वाहतूक सुरू झाली असली तरी अजूनही काल पडलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात या ओढ्याला येऊन मिसळताना दिसत आहे. या ओढ्याच्या परिसरात असलेले भराव पाण्याच्या वेगाने खचले असून पिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























