Mumbai Rain Updates: पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली, थोड्याचवेळात समुद्राला भरती, बीएमसीच्या युद्धपातळीवर हालचाली
Mumbai Rain updates: मुंबईकरांनो सावधान! रेल्वे ट्रॅक अन् रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात, मशीद बंदर स्टेशनचं वॉटरपार्क झालं. मुंबईत सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Mumbai Rain updates: राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुंबईला यलो अलर्ट दिला असून काही तास मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील, असा इशारा दिला होता. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. यापेक्षा समुद्रात मोठ्या लाटा उसळताना दिसतील. समुद्राला भरती आल्यानंतर मुंबईतील पाण्याचा निचरा होणे बंद होते. गेल्या काही तासांमधील पावसामुळे आताच मुंबईतील सखल भाग आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. आता समुद्राला भरती आल्यास पाण्याचा निचरा बंद होऊन मुंबईत आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
माटुंगा, मस्जिद बंदर या रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात साचलेले पाणी आता फलटाच्या उंचीच्या जवळपास पोहोचल्याने येथील वाहतूक कधीही ठप्प होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. तर पूर्व द्रुतगती महार्गावर आणि एलबीएस मार्गावर भांडूप, कांजूर आणि सायन परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.
🗓️२६ मे २०२५
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 26, 2025
⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊भरती -
सकाळी ११:२४ वाजता - ४.७५ मीटर
ओहोटी-
सायंकाळी ०५:१८ वाजता - १.६३ मीटर
🌊भरती -
रात्री- ११:०९ वाजता - ४.१७ मीटर
ओहोटी-
उद्या २७.०५.२०२५ रोजी…
Mumbai Rain: मुंबई महानगरपालिका युद्धपातळीवर कामाला लागली
मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहेत. पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचारी ठिकठिकाणी अथकपणे कार्यरत राहून सेवा बजावत आहेत. तसेच, भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी पसरू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
Mumbai Rains: कुख्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन ते अडीच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिसांनी सबवे बाहेर बॅरिकेट लावून सबवे बंद केला आहे. सध्या अंधेरी सबवे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहन चालकांना अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्यासाठी पोलीस सूचना देत आहेत. सध्या सबवे मध्ये भरलेला पाणी पालिकेचे कर्मचारी जनरेटरच्या माध्यमातून बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
Mumbai Rain News: महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची तत्काळ कार्यवाही
मुंबईत झालेल्या पावसामुळे काही भागांमध्ये पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, त्या भागांबाबत संबंधित वॉर्ड कार्यालयांशी संपर्क साधून पाणी काढण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. महापालिकेची यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली असून, पाणी उपसा व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आणखी वाचा
























