Raigad Rain News : रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस, धबधब्यातून वेगाने खाली येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला
Raigad Fort: हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचलाय.

Raigad Rain News : राज्यातील अनेक भागात आज (सोमवार, 26 मे) पहाटेपासून दमदार पावसाने (Monsoon) हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच या पावसाचा फटका राजगड जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
दरम्यान, हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड (Raigad Fort) महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. किल्ले रायगड परिसरात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
श्रीवर्धनच्या वाळवटी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, सर्वाधिक पावसाची नोंद
हवामान विभागाने वर्तविलेलया अंदाजानुसार आज रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरू आहे. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्याला पावसाने अक्षरक्ष: झोडपले आहे. या जोरदार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावात पाणीच पाणी झाले आहे. श्रीवर्धनमध्ये तब्बल 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही नोंद आतापर्यंत सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा प्रवाह थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची मिलिमीटर नोंद
अलिबाग - 78
मुरुड - 371
पेण - 50
पनवेल - 82.4
उरण - 55
कर्जत - 54.6
खालापूर - 62
माथेरान - 181
सुधागड - 104
माणगाव - 63
तळा - 182
महाड - 99
पोलादपूर - 94
श्रीवर्धन - 307
म्हसळा - 300
रोहा - 166
एकूण पाऊस - 2249
एकूण सरासरी झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये 140.56 mm
अनेक झाडे उन्मळून पडली, पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून खोपोली, म्हसळा, महाड, माथेरान, अलिबाग, रोहा तालुक्यासह इतर भागात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने अनेक भागात रस्त्यावर वृक्ष कोलमडून पडले आहेत. म्हसळा खामगाव मार्गावर भला मोठा वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. तर तिकडे रोहा चानेरा मार्गावर देखील भला मोठा वृक्ष कोसळून पडल्याने वाहतूक ठप्प आहे. मुसळधार पावसाचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
वेलदूरमध्ये दरडीचा काही भाग घरावर कोसळला
गुहागरमधील वेलदूर मधल्या नवा नगर भागात दरडीचा काही भाग घरावर कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र घरच्या काही भागावर मोठ्या प्रमाणात दगड माती आल्याने घराचं मोठं नुकसान यात झालं आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडण्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहे. अडूर आणि असगोली मध्येही झाडांची पडझड झालीय. तर तालुक्यातील ग्रामीण भागातला वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा























