(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्याच्या भाविकाकडून विठु-रखुमाईसाठी सोन्याचे 2 हार अर्पण; जाणून घ्या किती आहे किंमत?
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिन्यात दररोज वाढ होत आहे
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरचं (Pandharpur) विठ्ठल मंदिर चर्चेच्या केंद्रस्थानी असून भाविक भक्तांची उत्सुकता येथील नव्याने सापडलेल्या मंदिर व मूर्तींबद्दल वाढली आहे. भाविक भक्तांकडून सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटो व व्हिडिओही शेअर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. येथील भुयारी खोलीत देव-देवतांच्या मूर्ती आढळून आल्यानंतर पुरातत्व विभागानेही येथे धाव घेतली होती. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठु-रखुमाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी दररोज गर्दी होत असते. त्यातच, आता आषाढी वारीसाठीही भाविक भक्तांची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, भाविकांकडून लाडक्या विठ्ठलाच्या दानपेटीत इच्छापूर्ती दान करण्यात येतं. भाविकांकडून रोख रकमेसह दाग-दागिने व मौल्यवान वस्तूही पांडुरंगाच्या चरणी अर्पण केल्या जातात. आता, पुण्यातील एका भाविकाने सोन्याचे (Gold) दोन हार विठुचरणी अर्पण केले आहेत.
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिन्यात दररोज वाढ होत आहे. पुण्यातील एका भाविकाने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस 15 लाख 91 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन हार अर्पण केले आहेत. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी, येथील विठ्ठलभक्त बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे सोन्याचे दोन हार अर्पण केले आहेत. या हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम म्हणजेच 15 तोळे असून त्याची किंमत 15 लाख 91 हजार 110 रुपये एवढी आहे. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भाविक तुपे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला आहे. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याहस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.
गेल्याच आठवड्यात मंदिरात सापडलं भुयार
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरु असतानामोठं गूढ उलगडलं. गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री 2 वाजता हनुमान गेटजवळ दोन दगडी फरशा खाली पोकळ भाग जाणवल्यावर या कामगारांनी ते दगड हलवून पहिले. त्यावेळी त्याच्या खाली अरुंद तळघर असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर, शुक्रवारी दुपारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पुरातत्व विभागाच्या टीमला पाचारण केले शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या तळघरावरील दगड काढून आत कर्मचारी उतरले असता समोरच्या बाजूला जवळपास 8 फूट लांब आणि 6 फूट उंच अशी खोली दिसून आली. यानंतर सुरक्षेचे नियम पळत येथे कर्मचारी उतरवून त्यांनी येथे तपासणी केली असता यात भुयारी खोलीत काही जुन्या मुर्ती असल्याचे समोर आले.