सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी महाविकासघाडीने कंबर कसली; सोमवारी पंढरपुरात बैठक, मग भव्य मेळाव्याचं नियोजन
सोलापूर , माढा या दोन लोकसभा जागांसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जागांची चाचपणी होणार असल्याचे समजते. या बैठकीसाठी शिवसेनेलाही निमंत्रित करण्यात आले असून शिवसेनेकडून या बैठकीला कोण येणार याबाबत उत्सुकता आहे.
पंढरपूर : लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election 2024) अजून जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यातील महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) बैठकांचा सपाटा मात्र जोरात आहे. सोमवारी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पंढरपूर येथील श्रेयस पॅलेसमध्ये होणार आहे. या बैठकीत सोलापूर , माढा या दोन लोकसभा जागांसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जागांची चाचपणी होणार असल्याचे समजते. या बैठकीसाठी शिवसेनेलाही निमंत्रित करण्यात आले असून शिवसेनेकडून या बैठकीला कोण येणार याबाबत उत्सुकता आहे.
सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेही माढा तालुक्यात येणार असून यात अजित पवार याना काही मराठा आंदोलकांनी माढा प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे .सोमवारी शरद हे सकाळी हेलिकॉप्टरने पावणे दहा वाजता माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे येणार असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा ते घेणार आहेत . यानंतर ते दुपारी बारा वाजता पंढरपूर येथे येणार असून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे देखील बारा वाजता सोलापूर येथून पंढरपूरला पोहचणार आहेत . यांनतर या दोन मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत श्रेयस पॅलेस येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या समवेत लोकसभा निवडणुकीसाठी बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेच्या नेत्यांनाही निमंत्रित केले असले तरी नेमके या बैठकीला कोण येणार हे अद्याप समजू शकले नाही .
कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चाचपणी होणार
सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा मतदारसंघ असून यंदा येथून आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु आहे. तर माढा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असल्याने येथील उमेदवारीबाबत चाचपणी होणार आहे. सध्या हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून माढ्यातील शरद पवार यांचे सहकारी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चाचपणी होणार आहे.
महाविकास आघाडीसाठी सोमवारची बैठक महत्त्वाची
माढा विधानसभेचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे , करमाळा विधानसभेचे आमदार संजयामामा शिंदे हे दोन्ही बंधू अजित पवार गटात असून फलटणचे रामराजे निंबाळकर , माळशिरसाचे उत्तम जानकर यांनीही अजित पवार याना साथ दिल्याने सध्या शरद पवार यांच्याकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही . यातच माढा लोकसभेसाठी शिवसेनेकडून धनगर नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नावाची चर्चा सुरु असून या मतदारसंघात जवळपास सहा लाख एवढ्या संख्येने धनगर समाज असल्याने ही जागा शिवसेनेला देण्याबाबत शिवसेना आग्रही आहे . त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीत सोलापूर आणि माढा लोकसभेबाबत गांभीर्याने विचार होणार आहे . यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील इतर जागांबाबत देखील विचारविनिमय होण्याची शक्यता असल्याने सोमवारची बैठक महाविकास आघाडीची महत्वाची मानली जाते.
शरद पवार जाणार पाडुंरंगाच्या दर्शनाला
या बैठकीनंतर शरद पवार , सुशीलकुमार शिंदे आणि इतर नेते हे पंढरपूर येथील धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी भोजनास जाणार आहेत . यानंतर शरद पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथील डॉ. निकम यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असून यानंतर शरद पवार हे विठ्ठल दर्शन घेणार आहेत. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन्ही नेते सध्या सोलापूर जिल्ह्यातून भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी एकत्र येत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे .
हे ही वाचा: