Madha Lok Sabha: मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न अन् व्हिडिओ व्हायरल करणे भोवलं; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
माढा लोकसभा मतदारसंघात एका माथेफिरू तरुणाने ईव्हीएम मशीन पेटवल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे कृत्य करणाऱ्यासह या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha) एका माथेफिरू तरुणाने मतदानाला आल्यावर थेट ईव्हीएम(EVM) मशीन पेटवल्याची घटना समोर आली होती. मतदान प्रक्रिया सुरु असताना अचानक घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मात्र, असे कृत्य करणे या तरुणाच्या चांगलच अंगलट आले आहे. मशीन पेटवणाऱ्या तरुणांसह याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
तरूणांवर गुन्हा दाखल
माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यात 7 मेला निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया पार पडली. अशातच माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील जि. प. प्रा शाळा मतदान केंद्र क्रमांक 86 वरील तीन ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ मतदान केंद्राच्या बाहेरील खिडकीतून चित्रीकरण करून ते व्हायरल केले होते. यातील मशीन पेटवणारा तरुण दादासाहेब चळेकर याने मतदान केल्यानंतर इतर तिघांनी मिळून मतदान केंद्रातील परिस्थितीचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केले.
याप्रकरणी पोलिसांनी बागलवाडी येथील समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण आणि सुनील सदाशिव चव्हाणसह अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . दरम्यान, यापूर्वीच गुन्ह्यातील मुख्य आणि मशीन पेटवणारा बागलवाडी येथील संशयित आरोपी दादासाहेब मनोहर चळेकर यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 10 मे पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
नेमके प्रकरण काय?
माढा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार 7 मे रोजी शांततेत मतदान चालू असताना बागलवाडी गावातील दादासो मनोहर चळेकर या मतदाराने बूथ क्रमांक 86 वर येऊन दुपारी 12.48 च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने खिशात आणलेल्या बाटलीतील द्रव टाकून मतदान केंद्रातील तीन ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटवून दिले. यात सुमारे 90 हजार रुपयाचे नुकसान केल्याची घटना घडली होती. दरम्यान, पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसारित झालेले चित्रीकरण आणि मतदान केंद्रातील परिस्थितीचे अवलोकन करून मतदान केंद्रामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले होते.
यात दादासो चळेकर यांनी मतदान केंद्रामध्ये येवून मतदान केल्यानंतर टेबलवर ठेवलेल्या तीन ईव्हीएम पेटविल्याची घटना काही अज्ञात इसमाने मतदान केंद्राच्या खिडकीच्या बाहेर उभे राहून स्वतःच्या खाजगी मोबाईल मध्ये चित्रित केले. तर समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण आणि सुनील सदाशिव चव्हाण यांनी देखील स्वतःच्या मोबाईलमध्ये मतदान केंद्रातील परिस्थितीचे अनाधिकाराने चित्रीकरण केल्याचे उघड झाले. भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया राबवणे आणि गुप्तता बाळगणे आवश्यक असताना त्यांनी सदरचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित केले होते. तपासाअंती या प्रकरणी पोलीस नाईक मोहसीन इकबाल सय्यद यांनी तक्रार दिली असता, त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु करत पुढील कारवाई केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या